News Flash

उपनगर-परभणी मुलींमध्ये तर ठाणे-पुणे मुलांमध्ये अंतिम सामना

किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा ३२-२८ असा पराभव केला

(संग्रहित छायाचित्र)

राज्य अजिंक्यपद किशोर कबड्डी स्पर्धा

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर विरुद्ध परभणी यांच्यात किशोरी गटाचा, तर ठाणे विरुद्ध पुणे यांच्यात किशोर गटाचा अंतिम सामना होईल.

रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने रायगडचा प्रतिकार ५१-१८ असा सहज पाडाव केला. हरजितकौर संधू, यासिका पुजारी, समृद्धी मोहिते यांचा चतुरस्र खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. रायगडच्या रश्मी पाटीलला थोपवण्यात उपनगर यशस्वी झाल्यामुळे त्यांनी हा मोठा विजय मिळविला. त्यातच नंदिता वाघलाही सूर सापडला नाही. परभणीने कोल्हापूरचे कडवे आव्हान ३९-३६ असे संपुष्टात आणले. परभणीच्या निकिता लंगोरे, गौरी दाहे, गीता तुरे यांनी धारदार आक्रमण व भक्कम बचाव करीत हा विजय खेचून आणला. अनुराधा पाटील, ऋतुजा अवघडी यांचा खेळ कोल्हापूरला विजयी करण्यात थोडा कमी पडला.

किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा ३२-२८ असा पराभव केला. राहुल वाघमारे, राहुल कळसे यांच्या जोरदार सुरुवातीच्या बळावर पुण्याने उपनगरवर लोण देत आघाडी घेतली. मध्यंतराला २०-८ अशी आघाडी पुण्याकडे होती. उत्तरार्धात ती आपल्या हातून निसटणार नाही, याची काळजी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. उत्तरार्धात उपनगरच्या रजतकुमार, आदित्य अंधेरे यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात उपनगरने ११ बोनस गुण मिळवले; पण त्यांच्या पराभवाने या सर्वावर पाणी फेरले गेले. ठाण्याने परभणीला ३५-३० असे पराभूत केले. मध्यंतराला १८-१२ अशी आघाडी घेणाऱ्या ठाण्याने शेवटपर्यंत संयमी खेळ करीत सामना आपल्या हातून निसटू दिला नाही. कौस्तुभ शिंदे, रोहन टोपरे, संजय म्हात्रे, रक्षीत कुंदर या विजयाचे शिल्पकार ठरले. परभणीकडून अरविंद राठोड, अभय मदाले, श्रीहरी होरगुले यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:43 am

Web Title: kishore kabaddi tournament final match between suburban parbhani girls and thane pune boys abn 97
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर!
2 वूडच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी
3 Padma Awards : ‘सुपरमॉम’चा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान, पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण
Just Now!
X