उसळता चेंडू डोक्यावर आदळून ऑस्ट्रेलियाचा फिलीप ह्य़ुजेसचा झालेला आकस्मिक मृत्यू आमच्या संघातील सर्वच खेळाडूंसाठी दु:खदायक आहे, असे न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने सांगितले.
न्यूझीलंडचा संघ येथे सध्या पाकिस्तानबरोबर मालिका खेळत आहे. ह्य़ुजेसला श्रद्धांजली वाहण्यासाठी न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात खेळ थांबविण्यात आला होता. मॅकलम म्हणाला, ‘‘आम्ही अनेक वेळा ऑस्ट्रेलियातील स्पर्धामध्ये खेळत असतो. त्यानिमित्ताने ह्य़ुजेसबरोबर आमची दोस्ती झाली होती. त्याला असे दुर्दैवी मरण आले यावर आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही. त्याच्या कुटुंबीयांच्या तसेच ऑस्ट्रेलियन संघाच्या दु:खात आमच्या संघातील सर्व खेळाडू सहभागी आहेत. गोलंदाज शॉन अ‍ॅबॉट हा लवकरात लवकर मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त व्हावा, अशी आम्हाला आशा आहे. क्रिकेट हा जरी स्पर्धात्मक खेळ असला तरी आम्ही सर्व देशांचे खेळाडू एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून एकाच कुटुंबाचे घटक आहोत, असे आम्ही मानतो. आमच्या कुटुंबातील एक सदस्य आम्ही गमावला आहे हीच आमची भावना आहे.’’