कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यातील आयपीएल 2021चा चौथा सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नितीश राणाने केकेआरकडून शानदार सलामी दिली. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. नितीश राणाने या सामन्यात अर्धशतक झळकावले.

आयपीएलमध्ये पहिल्या पाच फलंदाजांच्या क्रमवारीत अर्धशतक ठोकणारा नितीश राणा तिसरा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी सलामीवीर शेन वॉटसन यांनी ही कामगिरी केली आहे. नितीश राणा हा पराक्रम करणारा पहिला डावखुरा फलंदाज ठरला.

केकेआरसाठी 50हून अधिक षटकार

एवढेच नव्हे, केकेआरसाठी 50हून अधिक षटकार ठोकणारा तो सहावा फलंदाज ठरला. याआधी आंद्रे रसेल, ख्रिस लिन, युसुफ पठाण, सुनील नरिन आणि रॉबिन उथप्पा यांनी केकेआरसाठी ही कामगिरी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच नितीश राणा करोना पॉझिटिव्ह आढळला होता आणि तंदुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला. आजच्या सामन्यात नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी केकेआरसाठी 53 धावांची सलामी दिली. शुबमन बाद झाल्यावर राणाने कोणतेही दडपण न घेता डावाच्या दहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. नितीश राणाने विजय शंकरच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपल्या आयपीएल कारकीर्दीचे 12वे अर्धशतक पूर्ण केले. 80 धावांवर असताना राणा बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले. आपले

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणाने एका अनोख्या हावभावामध्ये आनंद साजरा केला. राणा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अलीकडे त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले.