आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) फलंदाज नितीश राणाची दुसरा कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. केकेआरने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. राणा आता संघातील उर्वरित खेळाडूंमध्ये प्रशिक्षणासाठी सामील झाला आहे.

केकेआरने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नितीश राणाची 19 मार्च रोजी चाचणी घेण्यात आली होती. 21 मार्चला तो मुंबईतील टीम हॉटेलमध्ये पोहोचला होता आणि त्यानंतर त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार 22 मार्चला पुन्हा त्याची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. आता त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत आणि पूर्णपणे ठीक आहे.”

 

“आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार तो आयसोलेशनमध्ये होता. गुरुवारी पुन्हा त्याची चाचणी घेण्यात आली आणि त्याचा दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. या गोष्टीचा आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच तो प्रशिक्षणाला सुरुवात करेल”, असेही केकेआरने सांगितले.

राणाची आयपीएल कामगिरी

आयपीएलच्या शेवटच्या सत्रात 26 वर्षीय राणाने 14 सामन्यांत 352 धावा केल्या. आयपीएलमध्ये नितीशने 60 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 28.17 च्या सरासरीने आणि 135.56 च्या स्ट्राइक रेटने 1437 धावा केल्या आहेत.

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) या वेळी लिलावात 8 खेळाडूंना संघात दाखल केले आहे. शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग यासारख्या खेळाडूंच्या आगमनाने संघ मजबूत झाला आहे.  सुनील नरिन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शुबमन गिल अशा खेळाडूंनी सजलेला कोलकाता संघ नव्या जोमाने या मोसमात दाखल होईल. कोलकाता संघ आपला पहिला सामना 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादशी (एसआरएच) खेळणार आहे.