इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नवा वाद उफाळून आला आहे. गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने अव्वल फिरकीपटू सुनील नरिनला खेळण्याची परवानगी मिळावी याकरिता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) कायदेशीर लढाई करण्याची तयारी केली आहे. नरिनला खेळण्याची परवानगी न मिळाल्यास केकेआर आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े
२०१४च्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पध्रेत वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे नरिन याच्यावर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळेच त्याला अंतिम लढतीत खेळता आले नव्हत़े  चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या त्या सामन्यात केकेआरला पराभव पत्करावा लागला होता़  त्यानंतर नरिन याला वेस्ट इंडिज संघाच्या भारत दौऱ्यात व विश्वचषकात खेळता आले नव्हते. नरिनला आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी मिळावी याकरिता केकेआरने न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्धार केल्याचे सूत्रांकडून समजत़े
दुखापतीमुळे निशाम, लिन यांची माघार
कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू जिमी निशाम आणि ख्रिस लिन यांनी दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आह़े  न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू निशाम याला यंदाच्या लिलावात संघात घेतले होते, तर ऑस्ट्रेलियन लिन याला संघासोबत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता़  मात्र संबंधित बोर्डानी बीसीसीआयला पत्र पाठवून हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे कळवले. त्यांना बदली खेळाडू म्हणून कोलकाताने अझर महमुद आणि जोहान बोथा यांना करारबद्ध केले आह़े

कोलकातातील पालिका निवडणुकांमुळे आयपीएलच्या वेळापत्रकात बदल
नवी दिल्ली : कोलकातामध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकींमुळे ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़े  कोलकाता नाइट रायडर्स यांना निवडणुकीमुळे १२ ते २५ एप्रिल या कालावधीत घरच्या मैदानावर सामना खेळता येणार नाही़  
‘‘१८ एप्रिलला निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव येथील सामने दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़े  यामध्ये तीन सामन्यांच्या तारखा, तर दोन सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, ’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली़  सुधारित वेळापत्रकानुसार पाच सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत़  
१४ एप्रिलला ईडन गार्डन येथे नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढत ३० एप्रिलला खेळविण्यात येणार आहे. नाइट रायडर्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात ईडन गार्डनवर २८ एप्रिलला होणारी लढत ७ मे रोजी आणि सुपर किंग्ज आणि नाइट रायडर्स यांच्यात चेन्नईत होणारी लढत ३० एप्रिलऐवजी २८ एप्रिलला खेळवण्यात येणार आह़े  
या सुधारित वेळापत्रकामुळे राजस्थान रॉयल्सच्या दोन सामन्यांच्या वेळेत बदल झाला आह़े  १४ एप्रिलला अहमदाबाद येथे मुंबई इंडियन्स विरुद्धची लढत दुपारी ४ वाजताची लढत सायंकाळी ८ वाजता, तर मुंबईत राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ही लढत सायंकाळी ८ ऐवजी दुपारी ४ वाजता खेळविण्यात येणार आह़े