कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

आपल्या घणाघाती फटकेबाजीने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलला रोखणे अद्याप कोणालाच जमलेले नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रसेल वादळ घोंघावण्याची शक्यता असल्यामुळे राजस्थानच्या खेळाडूंनी सावधान राहणे आवश्यक आहे.

शुक्रवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या लढतीत रसेलने अवघ्या १३ चेंडूंत ४८ धावा फटकावून कोलकाताला एक वेळ अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्याच्या या धडाक्यामुळेच कोलकाताचा संघ चार सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. रसेलव्यतिरिक्त ख्रिस लीन, नितीश राणा हेदेखील सर्वोत्तम लयीत असले तरी कर्णधार दिनेश कार्तिक व रॉबिन उथप्पा यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याशिवाय गोलंदाजी कोलकाताची कमकुवत बाजू असल्याचे बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात सिद्ध झाले. लॉकी फग्र्युसन, प्रसिध कृष्णा, पीयूष चावला यांना कामगिरीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कुलदीप यादव मात्र अपेक्षेप्रमाणे संघाला मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देत आहे.

दुसरीकडे बेंगळूरुलाच पराभूत करून यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवणाऱ्या राजस्थानची मदार धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्यावर आहे. परंतु बेन स्टोक्स व स्टीव्ह स्मिथ या नामांकितांना सातत्याने धावा करण्यात अपयश येत असल्यामुळेच राजस्थान चार सामन्यांतून अवघ्या एका विजयासह गुणतालिकेत तूर्तास सातव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट व जोफ्रा आर्चर या वेगवान त्रिकुटावर रसेलला रोखण्याची जबाबदारी असून फिरकीपटू श्रेयस गोपाळ काय कमाल करू शकतो, याचा प्रत्यय सर्वाना बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात आला.

संघ

  • कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज.
  • राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग, मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १