भारताचे माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. २७ डिसेंबर रोजी मार्टिन यांच्या गाडीला अपघात झाला होता. बडोद्याच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी होणारा खर्च पाहता त्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरु आहे.

यात आता भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याचाही समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल चर्चेत होता. पण त्याची कारणे नकारात्मक होती. आता मात्र तो एका चांगल्या कारणासाठी चर्चेत आला आहे. राहुलने जेकब मार्टिन यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली असल्याचे मार्टिन यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार ही मदत आतापर्यंत वैयक्तिक व्यक्तीने केलेल्या मदतींमध्ये सर्वाधिक आहे. मात्र ही रक्कम नक्की किती हे मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला आहे.

कृणाल पांड्याची माणुसकी! जेकब मार्टिनना पाठवला ‘ब्लँक चेक’

जेकब मार्टिन यांची प्रकृती खराब असल्याने सुरुवातीला ICU मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर मार्टिन यांची पत्नी ख्याती यांनी उपचारासाठी BCCI कडे मदत मागितली होती. नंतर ज्यावेळी हे प्रकरण प्रसारमाध्यमांत आले, तेव्हा इतर आजी माजी क्रिकेटपटूंनी सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम BCCI आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनने आर्थिक मदत केली. त्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान पठाण, युसूफ पठाण, झहीर खान, आशिष नेहरा, कृणाल पांड्या या क्रिकेटपटूंनीही त्यांना आर्थिक सहकार्य केले. त्यानंतर काही काळाने त्यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये आणल्याचे सांगण्यात आले.