पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने विक्रमाला गवसणी घातली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसनच्या विक्रमाबद्दल क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. भारताचा धडाकेबाज फलंदाज लोकेश राहुल यानेही त्याचे अभिनंदन केले, पण त्याची चांगलीच फजिती झाल्याने त्याच्यावर ट्विट डीलिट करण्याची नामुष्की ओढवली.

राहुलने एक ट्विट करत अँडरसनचं अभिनंदन केलं. त्याने ट्विटसह एक फोटोदेखील ट्विट केला.

पाहा डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट-

त्याने ट्विट केलेला फोटो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा होता. २०१८ साली झालेल्या या कसोटी मालिकेत भारताची धूळधाण उडाली होती. ४-१ असा भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे या ट्विटनंतर राहुल आणि टीम इंडियाला ट्रोल करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे नाईलाजाने राहुलला ते ट्विट डिलीट करावं लागलं. त्यानंतर त्याने वेगळा फोटो वापरून अँडरसनचं अभिनंदन केलं.

अँडरसनला ६००व्या बळीसाठी खूप वाट पाहावी लागली. कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला. तेव्हा अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला उसळत्या चेंडूवर माघारी धाडले आणि ६०० वा बळी टिपला.