विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार याबद्दलची चर्चा अजुनही सुरुच आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने काही महिन्यांपूर्वीच १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात मधल्या फळीसाठी विजय शंकर तर पर्यायी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलची निवड करण्यात आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकेश राहुल चौथ्या क्रमांकासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – ICC च्या ट्रोलिंगला सचिन तेंडुलकरचं सडेतोड प्रत्युत्तर

एका खासगी कार्यक्रमात गौतम गंभीरला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीविषयी प्रश्न विचारला. यावर बोलताना गौतम म्हणाला, “चौथ्या क्रमांकाच्या जागेवरुन भारत सध्या विचित्र अवस्थेत सापडला आहे. प्रदीर्घ काळासाठी भारतीय संघ व्यवस्थापन रायुडूला संधी देत राहिली, आणि अचानक त्याला विश्वचषक संघात स्थान नाकारण्यात आलं. आता भारताकडे लोकेश राहुल, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांचा पर्याय आहे. या तिघांपैकी एक फलंदाज चौथ्या जागेवर फलंदाजी करेल. इंग्लंडमधील खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जागा महत्वाची ठरणार आहे. संघाची खराब सुरुवात झाल्यास डाव सांभाळण्याची जबाबदारी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची आहे. यासाठी चौथ्या क्रमांकावर माझ्यामते लोकेश राहुल योग्य उमेदवार आहे.”

“राहुलची फलंदाजी तंत्रशुद्ध आहे. त्याच्याकडे सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे. मात्र कोणत्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेणार आहे. मात्र फलंदाजाने कोणत्याही जागेवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज रहावे.” लोकेश राहुलच्या फलंदाजीचं कौतुक करताना गंभीर पत्रकारांशी बोलत होता. बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी लोकेश राहुलचा पर्यायी सलामीवीर म्हणून विचार केला जाईल असे संकेत दिले होते. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेत लोकेश राहुलला संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – एकाने शिस्त मोडली, सर्वांना १० हजारांचा दंड ! वाचा धोनीने संघाला कशी शिस्त लावली