6 डिसेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सराव सामना खेळतो आहे. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळी करत भारताची बाजू मजबूत केली. मात्र सलामीवीर लोकेश राहुल मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यास अपयशी ठरला आहे. 18 चेंडूत अवघ्या 3 धावा काढून लोकेश राहुल सोपा झेल देत माघारी परतला. त्याच्या या फटक्यामुळे भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर चांगलेच नाराज झाले आहेत.

“फलंदाजीदरम्यान तो चांगल्या लयीत दिसत होता. मात्र प्रत्येक वेळी तो स्वतःला बाद करण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढतोय असं वाटतं. ज्या चेंडूवर राहुल बाद झाला, तो यष्टींच्या बाहेरचा होता. राहुलने पायांची हालचाल न करता शरीराच्या दुरुन हा फटका खेळला आणि विकेट गमावली. लोकेश आता तरुण आणि नवोदीत खेळाडू राहिलेला नाही. त्याच्याकडे 30 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडून आता बेजबाबदारीचा खेळ अपेक्षित नाहीये.” संजय बांगर यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

या कामगिरीनंतर सोशल मीडियावरही अनेकांनी राहुलवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी राहुलला संघातून वगळण्याचा सल्लाही बीसीसीआयला दिला आहे.