IPL 2020ची अधिकृत घोषणा २ ऑगस्टला करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडू हळूहळू IPLसाठी तयारी करू लागले आहेत. भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज लोकेश राहुलही IPLसाठी सज्ज झाला आहे.

लोकेश राहुल यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसेल. लोकेश राहुल प्रथमच IPL संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. गेल्या वर्षीच्या संघाचे नेतृत्व आर अश्विनकडे होते. पण त्याला संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवता आलं नाही. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. आता नव्या दमाच्या पंजाब संघाचे नेतृत्व लोकेश राहुल करणार असून तो तयारीला लागला आहे. संघाचा कर्णधार म्हणून तयारी करण्यासोबतच फलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी करण्याचेही आव्हान राहुलपुढे असणार आहे. त्याचसाठी तो नेट्समध्ये जोरदार सराव करताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

Music to my ears @kxipofficial

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

इन्स्टाग्रामच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने सराव करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बचावात्मक फलंदाजी ते हवाई फटके असे सर्वप्रकारचे फटके तो या व्हिडीओमध्ये खेळताना दिसतो आहे. IPLच्या पार्श्वभूमीवर त्याचा जोरदार सराव सुरू आहे. IPLमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असणारा लोकेश राहुल हा भारताचा पाचवा आणि जगातील १२ वा खेळाडू असणार आहे. आत्तापर्यंत एकही IPL चषक न जिंकलेला किंग्ज इलेव्हनचा संघ यावेळी कशी कामगिरी करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.