२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. वन-डे आणि टी-२० संघासाठी निवड समितीने यष्टीरक्षकाच्या जागेसाठी ऋषभ पंतची निवड न करता लोकेश राहुल आणि संजू सॅमसन या दोघांना स्थान दिलं आहे. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक अजय रात्राच्या मते वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताने लोकेश राहुलचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून वापर करावा.

अवश्य वाचा – कोणत्याही जागेवर फलंदाजीसाठी तयार, मॅनेजमेंटने निर्णय घ्यावा – रोहित शर्मा

“लोकेश राहुल सध्या ज्या फॉर्मात आहे ते पाहता साहजिकपणे यष्टीरक्षणासाठी त्यालाच पहिली पसंती मिळायला हवी. तो फलंदाजीत कोणत्याही जागेवर येऊ शकतो. यष्टीरक्षणातही त्याने स्वतःला सिद्ध केलंय. राहुल चांगला खेळाडू आहे तो कधीही भारतीय वन-डे, टी-२० संघात येऊ शकतो. त्याने आपला फॉर्म कायम राखला तर भारतीय संघाला एक गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू खेळवता येईल. त्यामुळे टी-२० आणि वन-डे साठी राहुलच पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असावा.” रात्रा हिंदुस्थान टाम्सला दिलेल्या मुलाखतीत होता.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला संघाबाहेर करत ऋषभ पंतला संधी दिली. परंतू ऋषभ पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्हे आयपीएलमध्येही ऋषभ आपली छाप पाडू शकला नाही. त्यामुळे २०२० वर्षात टीम मॅनेजमेंटने न्यूझीलंड दौऱ्यात पंतऐवजी लोकेश राहुलला यष्टीरक्षण दिलं. महत्वाची गो।ष्ट म्हणजे राहुलने यष्टीरक्षणात चोख कामगिरी बजावली. त्यामुळे ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं मॅनेजमेंट कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.