क्लेइन्हेस्लेरच्या गोलने नॉर्वेचा पराभव
लॉस्जलो क्लेइन्हेस्लेरच्या निर्णायक गोलच्या जोरावर हंगेरीने युरो २०१६ फुटबॉल स्पध्रेच्या बाद फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात नॉर्वेवर १-० असा विजय साजरा केला. या विजयामुळे ३० वर्षांनंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळण्याच्या हंगेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही संघांमध्ये १६ नोव्हेंबरला परतीचा होणार सामना आहे.
घरच्या मैदानावर झालेल्या या लढतीत यजमान नॉर्वेने आक्रमक खेळ करून सुरुवातीला वर्चस्व गाजवले. त्यांच्याकडून जवळपास १६ वेळा गोल करण्याचे प्रयत्न झाले, परंतु गोलजाळ्याच्या बारला लागून चेंडू परतत होता. या चढाओढीत मात्र हंगेरीने कल्पक खेळ केला. त्यांनी अचूक रणनीती आखून मोक्याच्या क्षणी गोल केला.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलीच लढत खेळणाऱ्या क्लेईन्हेस्लेरने अ‍ॅकोस एलेकच्या पासवर अप्रतिम गोल करून २५व्या मिनिटाला हंगेरीला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेपर्यंत कायम राखून हंगेरीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह हंगेरीने त्यांचा आंतरराष्ट्रीय गोलरक्षक माटरेन फुलॉपला श्रद्धांजली वाहिली. कर्करोगाशी सुरू असलेल्या लढाईत फुलॉपचे सामन्याच्या दिवशीच निधन झाले. या विजयामुळे हंगेरीने १९८६ नंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पध्रेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. १९८६ मध्ये मेक्सिको येथे झालेल्या विश्वचषक स्पध्रेत हंगेरी संघ खेळला होता. ‘‘१६ नोव्हेंबरला आणखी ९० मिनिटांचा खेळ करायचा आहे, हे आम्हाला विसरून चालणार नाही. प्रचंड दबावाखाली आम्ही शिस्तबद्ध खेळ केला,’’ अशी प्रतिक्रिया हंगेरीचे प्रशिक्षक बेर्नड स्टोर्क यांनी दिली.