* हैदराबादवर २२ धावांनी विजय
* सामनावीर पठाणचे अर्धशतक
* सुनील नरिनचे तीन बळी
सामनावीर युसूफ पठाण आणि मनीष पांडे यांची दमदार फलंदाजी व फिरकीपटू सुनील नरिनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने बाद फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना कोलाकाताने सनरायझर्स हैदराबादपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हैदराबादला १४९ धावा करता आल्या आणि कोलकाताने त्यांच्यावर २२ धावांनी विजय मिळवला.
हैदराबादने नाणेफेक जिंकत कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले. रॉबिन उथप्पाने (२५) संघाला जलद सुरुवात करून दिली. पण तो बाद झाल्यावर कोलकाताची ३ बाद ५७ अशी अवस्था झाली. पठाण आणि पांडे यांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. मोठा फटका मारण्याच्या नादात पांडे बाद झाला, त्याने ३० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४८ धावा केल्या. पांडे बाद झाल्यावर पठाणने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पठाणने नाबाद अर्धशतकासह संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पठाणने ३४ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या.
कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (१८) नरिनने स्वस्तात बाद केले. पण दुसरा सलामीवीर शिखर धवन खेळपट्टीवर पाय रोवून हैदराबादच्या विजयासाठी प्रयत्नशील होता, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही आणि हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. धवनने ३० चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. नरिनने यावेळी तिखट मारा करत तीन बळी मिळवले, तर कुलदीप यादवने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १७१ (युसूफ पठाण नाबाद ५२, मनीष पांडे ४८; दीपक हुडा २/१६) विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४९ (शिखर धवन ५१; सुनील नरिन ३/२६, कुलदीप यादव २/२८).

सामनावीर : युसूफ पठाण.

Untitled-27