वन-डे, टी-२० किंवा कसोटी क्रिकेट असो प्रत्येक सामन्यात शतक झळकावं अशी फलंदाजांची इच्छा असते. कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांची संख्या मोठी आहे. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये शतकं झळकावणं हे तितकं सोपं मानलं जात नाही. टी-२० क्रिकेटमध्ये खेळाचा वेग आणि षटकांची कमी संख्या यामुळे फार कमी फलंदाजांना शतक झळकावता आलेलं आहे. आज आपण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.

३) सुरेश रैना – मे २०१० साली सुरेश रैनाने पहिल्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला होता. त्याच्याआधी ख्रिस गेल आणि ब्रँडन मॅक्युलम या फलंदाजांनी टी-२० त शतक झळकावलं होतं. यानंतर जुलै २०१० मध्ये कसोटीत शतक झळकावत सुरेश रैना तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला.

२) लोकेश राहुल – राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक २०१६ साली तर दुसरं टी-२० शतक २०१८ साली झळकावलं. सध्याच्या घडीला लोकेश राहुलच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये २, वन-डेमध्ये ४ तर कसोटीत ५ शतकं जमा आहेत.

१) रोहित शर्मा – टीम इंडियात सलामीच्या जागेवर खेळणारा रोहित शर्मा सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. २०१५ साली रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. रोहितच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ४, कसोटीत ६ तर वन-डे क्रिकेटमध्ये २९ शतकं जमा आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये नेहमी चुरस रंगलेली असते, मात्र विराटला अद्याप टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकता आलेलं नाही. महेंद्रसिंह धोनीलाही ही किमया जमलेली नाही.