आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचे हक्क अखेरीस Dream 11 या कंपनीला मिळाले आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy यासारख्या ब्रँडना मागे टाकत Dream 11 ने २२२ कोटींची बोली लावत हक्क विकत घेतले. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बीसीसीआय आणि Dream 11 यांच्यातला करार कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात आलेल्या या कंपनीने फार कमी कालावधीत भारतीय बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन भारतीयांनी या कंपनीची स्थापना केली असून या कंपनीत अमेरिका आणि चीनमधील काही कंपन्यांचीही भागीदारी आहे.

अवश्य वाचा – …तर पुढील तीन वर्षांसाठी Dream 11 कडेच राहू शकते IPL स्पॉन्सरशिप

Dream 11 हा Dream Sports या कंपनीचा ब्रँड आहे. Make Sports Better हे या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे. २००८ साली या कंपनीची स्थापना झाली. हर्ष जैन आणि भावित सेठ हे या कंपनीचे मालक आहेत. २०१२ साली कंपनीने Fantasy Cricket League लॉन्च केली. ज्याला डिजीटल माध्यमांवर तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०१४ पर्यंत या ब्रँडच्या यूजर्सची संख्या १ लाखापर्यंत जाऊन पोहचली. २०१५ साली कंपनीने Series A स्पर्धेला मान्यता दिली, २०१६ पर्यंत ही संख्या तब्बल १३ लाखांवर जाऊन पोहचली. कंपनीच्या प्रमोशनसाठी २०१७ साली प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना कंपनीने आपला ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषित केलं. ज्याचा कंपनीला चांगलाच फायदा झाला. २०१८ पर्यंत या ब्रँडचे यूजर्स १ कोटींच्या पुढे गेले.

अवश्य वाचा – IPL 2020 : स्पॉन्सरशिप शर्यतीत आघाडीवर असलेलं Tata Sons मागे का पडलं? जाणून घ्या कारण…

दरम्यानच्या काळात Dream 11 ने ICC, प्रो-कबड्डी, FIH, बिग बॅश लिग यांसारख्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आणि संघटनांना स्पॉन्सरशिप देण्यास सुरुवात केली. २०१८ नंतर कंपनीने धोनीला आपला ब्रँड अँबेसिडर म्हणून जाहीर केलं. फँटसी हॉकी लिग, फँटसी व्हॉलिबॉल लिग अशी या कंपनीची अनेक उत्पादनं आहेत. २०१९ मध्ये या कंपनीच्या ब्रँडचे युजर्स ७ कोटींच्या वर गेले आहेत. २० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या ब्रँडशी जोडले गेले आहेत.