News Flash

Exclusive: कोल्हापूरची ही ओळख तुम्ही कायम लक्षात ठेवाल

मैदान गाजवणारे कोल्हापूरचे फुटबॉलवीर

छत्रपती काळापासून सुरु असलेल्या फुटबॉल परंपरेचा घेतलेला आढावा

स्थळ – कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजवाड्यातील पोलो मैदान
वेळ – साधारण दुपारी १२.३०

एका बाजूला विस्तीर्ण पसरलेलं माळरान आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा राजवाडा. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात संग्रहालयात अनेक लोकं छत्रपतीकालीन इतिहास पुन्हा अनुभवण्यासाठी येत असतात आणि त्याचवेळा बाजूच्या पोलो मैदानावर मुलं-मुली आपल्या फुटबॉलच्या सामन्यांसाठी सराव करत असतात. हे चित्र तुम्हाला साधारण युरोपातल्या कोणत्याही देशांमध्ये दिसेल. कारण बाहेरील देशांना फुटबॉलची परंपरा आहे. पण कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे चित्र आता नेहमीचं झालेलं आहे. कारण कोणत्याही सरकारी मदतीशिवाय छत्रपती शाहू आणि राजाराम महाराज यांच्या काळापासून कोल्हापूर आपली फुटबॉलची परंपरा आजपर्यंत अविरतपणे जपत आलंय.

आगामी महिन्यात फिफाचा १७ वर्षांखालील मुलांचा विश्वचषक भारतात भरवला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार सध्या वातावरण निर्मिती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतंय. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघाची प्रांतवार फोड करायला गेलं तर ईशान्येकडील राज्यांचा या संघावर दबदबा पाहायला मिळतो. यानंतर दोन अनिवासी भारतीयांनाही या संघात जागा मिळाली आहे. आणि सर्वात शेवटी महाराष्ट्राच्या एका खेळाडूला या संघात जागा मिळाली आहे, तो म्हणजे कोल्हापूर शहरातला अनिकेत जाधव. २१ जणांच्या संघात महाराष्ट्राच्या अवघ्या एका खेळाडूला जागा मिळते, याबाबत कदातीच क्रीडाप्रेमींना फारस वावगं वाटणार नाही. कारण पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही एकेकाळ फुटबॉलची समृद्ध परंपरा लाभली आहे, याचा लोकांना विसरच पडला आहे.

महाराष्ट्रात फुटबॉल फॉलो करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे यांच्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो. फुटबॉल म्हटलं की आजही तरुण खेळाडूंच्या समोर रुनी, मेस्सी, रोनाल्डो यांच्यासारखे सुपरस्टार येतात. खेळाची आवड असणाऱ्या ग्रुपवर मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, आर्सनल यांच्यासारख्या इंग्लिश फुटबॉल क्लबच्या कामगिरीवर चर्चा घडली जाते. मात्र यापैकी फार कमी तरुणांना बारा ईमाम, शिवाजी तरुण मंडळ, सरदार तालिम फुटबॉल क्लब, शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टीस क्लब कोल्हापूर अशा क्लबची नाव माहिती असतील. नीट विचार केला तर यात तरुणांना दोष देऊन भागणार नाही. कारण कोणताही खेळ किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार केला की परदेशात डोकावून बघण्याची वाईट सवय भारतीय क्रीडा संस्कृतीत लावली जाते. स्थानिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात निर्माण होणारं नेतृत्व पुढे आणण्यास, त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळा आयाम देण्यास सरकारी यंत्रणा या नेहमी कमी पडत आल्या आहेत. एखादी स्पर्धा आली की घरच्या मुलीचं लग्न असल्याप्रमाणे त्याला सोहळ्याचं रुप द्यायचं, मान्यवरांच्या हस्ते फोटोसेशन करुन आपली हौस भागवून घ्यायची; इतक्याच गोष्टींमध्ये राज्याचा किंबहुना देशाचा क्रीडा विभाग गुंतलेला पाहायला मिळतो.

स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरने आतापर्यंत तब्बल ८० हून अधिक फुटबॉलपटू घडवलेले आहेत. मात्र सरकारची मेहेरनजर यांच्यावर पडली नसल्याने हे रांगड टँलेट आतापर्यंत कधीही लोकांच्या नजरेस पडलं नाही. आज अशा काही खेळाडूंची आपण ओळख करुन घेणार आहोत, ज्यांना रोनाल्डो, मेस्सी, रुनी सारख्या खेळाडूंएवढी प्रसिद्धी नक्कीच लाभली नाही, मात्र फुटबॉलच्या मैदानात त्यांनी केलेली कामगिरी ही नक्कीच कोणत्याही युरोपियन देशातील खेळाडूंना लाजवणारी होती.

व्हॉली किकचा ‘राजा’ पायलट बलराज साळुंखे –

दिवंगत बलराज साळुंखे

बलराज साळुंखेंचा जन्म १९२० साली कोल्हापूरात झाला. लहानपणापासून घरची आर्थिक परिस्थिती ही उत्तम असल्याने बलराज यांना कशाचीही ददात नव्हती. मात्र समाजसेवेची आवड बलराज यांना भारतीय वायुदलात घेऊन आली. बलराज यांनी दुसऱ्या महायुद्धातही आपला सहभाग नोंदवला होता.काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं

बलराज हे कोल्हापूरच्या शिवाजी तरुण मंडळाकडून हाफबॅक पोझिशनवर खेळायचे. जाणकारांच्या सांगण्यानुसार लष्करात काम केलेल्या बलराज यांच्या खेळात कधीही धसमुसळेपणा दिसला नाही. बलराज यांची व्हॉली किक पाहण्यासाठी जुन्या काळापासून लोकं मैदानात गर्दी करायची. रनिंग, बॉडी आणि बॉल टॅकलिंग यांच्यासारखे गुण बलराज यांच्या नसानसांमध्ये भिनलेले होते. बलराज यांनी हाफबॅक एरियातून मारलेला बॉल हा प्रतिपक्षाच्या गोलपोस्टपर्यंत जाऊन पोहचत असे. अनेक स्थानिक पातळीवरील सामन्यांमध्ये बलराज यांनी आपल्या खेळाची चमक दाखवली होती.

प्रॅक्टिस क्लबचा बुरुजबंद फुलबॅक शंकरराव कदम –

शंकरराव कदम

कोल्हापुरात खेळाडूंचीही ओळखही तितक्याच रांगड्या पद्धतीने करुन दिली जाते. असाच रांगडा खेळ करणारे प्रॅक्टिस क्लबचे शंकरराव कदम आजही आपल्या जुन्या आठवणींमध्ये सहज हरवून जातात. आजही वयाच्या ८७ व्या वर्षात पदार्पण केलेलं असताना शंकरावांची प्रकृती तशीच धडधाकट आहे. याचं श्रेय आपल्या उमद्या वयात फुटबॉलच्या मैदानावर केलेल्या खेळाला ते देतात. आपल्या तरुण वयात राजाराम कॉलेज आणि प्रॅक्टिस क्लब यांच्याकडून खेळताना फुलबॅक पोजिशनवर खेळताना शंकररावांचे खेळ विशेष बहरायचा.

जबरदस्त हेडींगचं कौशल्य, बॉलचा ताबा आपल्यापाशी जास्त वेळ न ठेवता सतत रोटेट करत राहणं, यासारख्या कौशल्यांमुळे शंकराव कदमांची ओळख जुन्या काळात एक पट्टीचा फुटबॉलपटू म्हणून होती.

‘शेर-ए-बाराईमाम’ वसंतराव पाटील –

वसंतराव पाटील

बाराईमाम या क्लबला कोल्हापूरच्या फुटबॉल कल्चरमध्ये विशेष म्हत्व आहे. सर्व महत्वाच्या खेळाडूंनी या क्लबचं प्रतिनिधीत्व केलं आहे. वसंतराव पाटील यांचा जन्म बेळगावच्या ब्याकूड गावचा. मात्र छत्रपती शाहुराजे आणि राजाराम महाराज शिकारीसाठी बेळगाव परिसरात जात असताना पाटील घराण्याच्या कार्य कर्तृत्वावर खूश होऊन त्यांनी पाटील यांना ६० एकर जमीन ईनाम दिली होती. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेले वसंतराव मग फुटबॉलकडे वळले.

वसंतरावांचं कौशल्य म्हणजे ते फुटबॉल सामन्यात कोणत्याही जागेवरुन खेळण्यास तयार असायचे. आपला खेळ त्यांनी एका साच्यात कधीही बांधला नाही. पण लेफ्ट इन आणि राईट इनच्या जागेवरुन खेळताना त्यांचा खेळ विशेष बहरायचा असं जाणकार सांगतात. प्रतिस्पर्धी खेळाडूला फसवून बॉल पास करण्याचं उत्तम तंत्र वसंतरावांना अवगत होतं.

अशा अनेक खेळाडूंची ओळख तुम्हाला करुन देता येईल ज्यांनी आपलं आयुष्य फुटबॉलसाठी खर्ची घातलं. काहींनी लष्करी सेवेत असतानाही आपल्यातला फुटबॉलपटू कायम जागा ठेवला. यांच्यासारख्याच तब्बल ८० हून अधिक खेळाडूंनी जुन्या काळात स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. पण आज हा आकडा खाली आला आहे. सध्याच्या घडीला कोल्हापूरचे ३-४ खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोहन बागान, डेम्पोसारख्या क्लबमध्ये खेळतात. मग इतकी समृद्ध परंपरा असतानाही इतक्या वर्षांमध्ये कोल्हापूरात एक अत्याधुनिक सोयी-सुवीधांचं फुटबॉल केंद्र तयार करावं असं एकाही क्रीडामंत्र्याला वाटू नये. मुळात खेळ हा महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी ऑप्शनला टाकलेला विषय आहे. आजही कोल्हापूरमध्ये फुटबॉलपटू हे स्थानिक Kolhapur Sports Association च्या माध्यमातून आपली फुटबॉलची आवड जपत आहेत. सरकारी मदतीची यांना अपेक्षाही नाही. छत्रपतींच्या कुटुंबामुळे सध्या कोणत्याही खेळाडूला आर्थिक बाबींची कधीही अडचण भागत नाही. मग राज्य सरकारचं क्रीडा मंत्रालय यातून काही शिकणार की नाही असा प्रश्न निर्माण होतो.

राज्यात क्रीडासंस्कृती वाढली जावी यासाठी नेमके कसे प्रयत्न केले जावेत, हे मुळात इथल्या राज्यकर्त्यांच्या गावीच नाही. विश्वचषकाचा माहोल तयार करण्यासाठी महाराष्ट्रात विधानभवनात आमदारांची फुटबॉल मॅच खेळवण्यात आली. यातून नेमकं साध्य काय झालं हे क्रीडामंत्री जाणोत. यानंतर मिशन वन मिलीयन फुटबॉल या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबररोजी फुटबॉल खेळण्यास भाग पाडलं गेलं. प्रसारमाध्यमांमध्ये शोबाजी करण्यासाठी सर्व मान्यवरांनी फुटबॉलला किक मारली. पत्रकारांसोबत सेल्फी काढले, काही वेळासाठी का होईना पण मैदानात सामनाही खेळला. मग हा उपक्रम कसा यशस्वी झाला यासाठी मोठमोठ्या आकड्यांची धुळफेक करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष मैदानावर नेमकी काय परिस्थिती आहे, याची राज्याच्या क्रीडामंत्रालयाला तरी माहिती आहे की नाही हा मोठा प्रश्नच आहे.

राज्याच्या अनेक शाळांमध्ये मैदानच नाहीत. औरंगाबाद मधल्या काही शाळांनी मैदान नाही याकारणासाठी मुलांना पायपीट करत दुसऱ्या शाळेच्या मैदानात नेऊन सामना खेळवला. नागपूरमध्ये काही शाळांनी फक्त सेल्फी काढून जिल्हा क्रीडाविभागाला पाठवले. काही शाळांनी तर या उपक्रमात सहभागी होण्याची तसदीही घेतली नाही. नवी मुंबईसारख्या सुसज्ज आणि सुनियोजित शहरात जवळपास २७ शाळांना मैदान नाहीयेत. अनेक शाळांमध्ये क्रीडाशिक्षकांची भरती झालेली नाही. मग असं वातावरण असताना, फक्त एका दिवसापुरतं देखावा निर्माण करुन फुटबॉल खेळून नेमकं काय साध्य होणार आहे?

आजही कोल्हापूर शहर आपली परंपरा जोपासत आहे. इथल्या मुलांना खेळ शिकवावा लागत नाही, इथली मुलं जन्मालाच खेळाडू म्हणून येतात. कधी कुस्ती, कधी खो-खो, कधी फुटबॉल तर मग कधी रायफल शुटींग. क्रीडाक्षेत्रात कोल्हापूर आपला दबदबा कायम ठेऊन आहे. आजही फुटबॉल खेळायचं म्हणलं की शहरातील खेळाडूंना हक्काचं शाहू मैदान आहे. त्यासाठी त्यांना गल्लीबोलाळात जाऊन मिळेल त्या जागेत फुटबॉल खेळावं लागत नाही.

पोलो मैदानावर राजवाड्याच्या लगतच एका झाडावर मोर येऊन बसतो. मुलं मैदानावर खेळत असताना त्यांना पाहून तो नेहमी विशिष्ट पद्धतीने साद घालतो. काही खेळाडूंच्या मते मोर आणि त्यांचं अतुट नातं आहे. मोराने साद घातली की आमचा संघ नेहमी जिंकतो असं सांगत ते सामन्याआधी मैदानावर येऊन मोराशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टी आपल्याला अंधश्रद्धा वाटू शकतात. मात्र सातवी आणि आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. अभ्यासात कितीही ताण असला तरीही या ओढीने आम्ही दिवसातून एकदा का होईना मैदानावर चक्कर मारतोच असं काही तरुण खेळाडूंनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सांगितलं.

आज भारतात फुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडची राज्य. मुंबई-पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांत तुम्हाला इंग्लिश फुटबॉलपटूंच्या जर्सी घालून काही खेळाडू सराव करताना नक्की दिसतील. मात्र त्यातले किती खेळाडू हे पुढे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर खेळतात हा संशोधनाचा विषय आहे. कोल्हापूर मात्र या बाबतीत वेगळं ठरत. केवळ छंद म्हणून नाही तर परंपरा म्हणून इथे फुटबॉल जपला जातो. आज अनिकेत जाधवच्या रुपाने बऱ्याच वर्षांनी इथल्या क्रीडा संघटकांच्या तपश्चर्येला फळ आलंय. हा सराव असाच चालू ठेवल्यास आगामी काळात कोल्हापूर फुटबॉलमध्ये आपलं नाव पुन्हा मोठं करेल यात काही शंका नाही.

  • प्रथमेश दीक्षित – prathmesh.dixit@indianexpress.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2017 3:03 pm

Web Title: know the contribution of these unsung heros of football from kolhapur city special story on football culture of kolhapur city ahead of u 17 fifa world cup
टॅग : Kolhapur
Next Stories
1 हार्दिक ‘हे’ स्वप्न लवकरच पूर्ण करेल, वडिलांनी व्यक्त केला विश्वास
2 षटकार माझा बालपणीचा छंद, आताचे शास्त्र!
3 बेंगळूरुच्या एकदिवसीय सामन्यावरही पावसाचे सावट
Just Now!
X