भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चाहत्यांसाठी एका प्रकारे पर्वणीच असते. सध्याच्या काळात अनेकदा सोशल मीडियावर दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना भिडतात. मात्र या सगळ्यात खेळभावना कुठेतरी संपते असं मत अनेकदा व्यक्त होताना दिसतं. बऱ्याचवेळा पाकिस्तानी खेळाडूंचं कौतुक करणाऱ्या माजी खेळाडूंना, समालोचकांनाही टीका सहन करावी लागते. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. ते ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात बोलत होते.

“जर आपल्याला बाबर आझमची फलंदाजी आवडली तर तसं म्हणण्यात गैर काय आहे? शेवटी हा एक खेळ आहे”, मात्र आजकाल ही भावना समजून घेतली जात नाही”, भोगले बोलत होते. यावेळी हर्षा भोगले यांनी त्यांच्या पाकिस्तान कनेक्शनबद्दल एक आठवण सांगितली, ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.