NBA Los Angeles Lakers संघाकडून खेळणारा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी अमेरिकेतील लॉस एंजलिस भागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कोबे त्याची १३ वर्षांची मुलगी आणि इतर ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. कोबेच्या या अपघाती निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजलिस येथून उड्डाण केल्यानंतर कॅलिफॉर्निया भागात ढगाळ वातावरणात हेलिकॉप्टरच्या पायलटचं नियंत्रण सुटलं. यानंतरच हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचं होतं. अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे बचावपथकाला बऱ्याच अडथळ्यांचा सामनाही करावा लागला. दुर्दैवाने या अपघातात कोणीही वाचू शकलं नाही. स्थानिक अधिकारी या अपघातामागचं खरं कारण तपासत आहेत. कॅलिफॉर्निया भागातील ऑरेंज कंट्री परिसरात कोबेचं घर आहे. कोबेची मुलगी बास्केटबॉल अकादमीच्या सामन्यात सहभागी होणार होती. याच सामन्यासाठी जात असताना कोबे आणि तिच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

४१ वर्षीय कोबे ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (NBA) सक्रिय होता. आपल्या काळात ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला NBA Championship मिळवून दिली होती. आपल्या कारकिर्दीत कोबेने १८ वेळा NBA All Star हा मानाचा किताब पटकावला होता. याव्यतिरीक्त अन्य पुरस्कारांनीही त्याचा सन्मान करण्यात आलेला होता.