प्रारंभी फारशा न रंगलेल्या एखाद्या मैफलीत नंतर गायकांना चांगला सूर गवसल्यामुळे ती रंगत जावी, असेच काहीसे वर्णन जामठा येथे सुरू असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे करता येईल. दिल्लीचा युवा फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या जोडीने सहाव्या विकेटसाठी १९८ धावांची भक्कम भागीदारी भारताच्या धावफलकाला दिलासा दिला. ही कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्ध मालिकेत बरोबरी साधण्याचा निर्धार त्यांच्या खेळीत दिसून आला. कोहली शतक साकारल्यानंतर बाद झाला आणि मग अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. धोनीचे शतक दुर्दैवाने अवघ्या एका धावेने हुकल्यामुळे क्रिकेटरसिकांची घोर निराशा झाली. दिवसअखेर इंग्लिश गोलंदाजांनी पुन्हा नियंत्रण मिळवत भारताची ८ बाद २९७ अशी अवस्था केली. सध्या भारत ३३ धावांनी पिछाडीवर असल्यामुळे सामना कुणाच्या बाजूने झुकणार, याचे उत्तर तिसऱ्या दिवसानेही निश्चितपणे दिलेले नाही.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारनंतर दोन बदल पाहायला मिळाले. एक होता वातावरणातला सुखद बदल. इंग्लिश खेळाडूंना नकोसे वाटणारे ऊन नाहीसे होऊन आकाशात ढग दिसू लागले. याच्या बरोबरीने दुसरा बदल होता सामन्यातला. ८२व्या षटकात इंग्लंडने नवा चेंडू घेतला आणि त्यानंतर खेळपट्टी अनुकूल नसतानाही भारतीय फलंदाजांच्या धावांचा वेग वाढला. कोहली आणि धोनी यांची जोडगोळी अशी स्थिरावली की शनिवारी दिवसभरात दोघांपैकी कुणीही बाद होणार नाही, असे वाटू लागले. अखेरच्या सत्रात पाऊण तासाचा खेळ उरला असताना कोहली बाद झाला आणि त्यानंतर भारताची घसरण पाहून चाहत्यांच्या मनात पसरलेला दिलाशाचा गडद रंग फिका झाला.
४ बाद ८७ अशा डळमळीत स्थितीत कोहली-धोनी जोडीने शनिवारी सकाळी डाव सुरू केला. आत्मविश्वास येईपर्यंत जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहण्याचा आणि जमेल तितक्या धावा जोडण्याचे विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या भारतीय फलंदाजांचा प्रयत्न सुरू होता. पहिल्या सत्रात या दोघांनी मारलेल्या चौकारांमुळे भारतावरील दडपण कमी होण्यास मदत झाली. आज कोहलीने त्याचे कसोटीतील तिसरे शतक पूर्ण केले, तर धोनीने २८वे अर्धशतक पूर्ण केले.
मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर हा सामना जिंकण्याशिवाय भारतासमोर पर्यायच नाही. त्याची जाणीव उपाहारानंतरच्या खेळात भारतीय फलंदाजांमध्ये दिसून आली. ८२व्या षटकात इंग्लंडने नवा चेंडू घेतला, मात्र त्यांच्या गोलंदाजांना अपेक्षित तसा फायदा न होता उलट हा बदल भारतील फलंदाजांच्या पथ्यावर पडला. ९३व्या षटकात ग्रॅमी स्वानला एक षटकार खेचून धोनीने वातावरणात चैतन्य आणले. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने एकामागोमाग एक गोलंदाज बदलून पाहिले, परंतु टिम ब्रेस्नन आणि काही प्रमाणात माँटी पनेसारचा अपवाद वगळता कुणीही कोहली-धोनी जोडीची एकाग्रता भंग करू शकले नाही. भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरलेल्या जेम्स अँडरसनचाही या दोघांनी सहज सामना केला.
विराट कोहलीने त्याचे कसोटीतील तिसरे शतक पूर्ण केल्यानंतर झालेला आनंद तो लपवू शकला नाही. २९५ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह १०३ धावा काढल्यानंतर ग्रॅमी स्वानने त्याला पायचित केले.
संघनायक महेंद्रसिंग धोनीने आपले अपयश पुसून टाकणारी सर्वागसुंदर खेळी साकारली. सामना संपण्याच्या काही वेळापूर्वी शतक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली एक धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावचीत झाला आणि मग मात्र भारत पहिल्या डावात सहज आघाडी मिळवेल, ही आशा धूसर झाली.
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ३३०
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर झे. प्रायर गो. अँडरसन ३७, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. अँडरसन ०, चेतेश्वर पुजारा झे. बेल गो. स्वान २६, सचिन तेंडुलकर त्रिफळा गो. अँडरसन २, विराट कोहली पायचीत गो. स्वान १०३, महेंद्रसिंग धोनी धावचीत ९९, रवींद्र जडेजा पायचीत गो. अँडरसन १२, पीयूष चावला त्रिफळा गो. स्वान १, आर. अश्विन खेळत आहे ७, अवांतर १० (५ बाइज, ५ लेगबाइज), एकूण १३०.१ षटकांत ८ बाद २९७ धावा.
बाद क्रम १-१, २-५९, ३- ६४, ४- ७१, ५-२९५, ६-२८८, ७-२९५, ८-२९७.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १२६-५-६८-४, टिम ब्रेस्नन २६-५-६९-०, माँटी पनेसार ४६-१५-६७-०, ग्रॅमी स्वान ३०.१-९-७६-३, जोनाथन ट्रॉट १-०-२-०, जो रूट १-०-५-०.

कारकिर्दीमधील महत्त्वाच्या डावामध्ये झळकावलेले शतक माझ्यासाठी आनंददायी आहे. मी धावांचा, चेंडूंचा विचार केला नाही, फक्त खेळत राहिलो. अशाप्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीत खेळणे मला नेहमीच आवडते. याचप्रमाणे दिवसभर धडाडीने खेळणाऱ्या धोनीचे शतक हुकल्यामुळे वाईट वाटले.
-विराट कोहली, भारताचा फलंदाज

शनिवारी बराच वेळ बळी न मिळाल्याने आम्ही धास्तावून गेलो नाही. उत्तरार्धात चार बळी मिळाल्याने आता आम्हाला संधी मिळाली आहे. अर्थात भारतीय फलंदाज शनिवारी चांगलेच खेळत होते. रविवारी चौथ्या दिवशीचा खेळ महत्त्वाचा ठरणार असून भारताचा डाव लवकरात लवकर गुंडाळणे व त्यानंतर जास्तीत जास्त धावा काढणे अशी आमची रणनीती राहणार आहे.
– जोनाथन ट्रॉट, इंग्लंडचा फलंदाज

क्षणचित्रे
-पहिल्या दोन दिवसांपेक्षा शनिवारी तिसऱ्या दिवशी जामठा स्टेडियमवरील गर्दी लक्षणीयरित्या वाढली होती. शनिवार असल्यामुळे सुमारे वीस हजार प्रेक्षक भारताची फलंदाजी पाहण्यासाठी उपस्थित होते.
-विराट कोहलीने शतक झळकावताच प्रेक्षकांमधून एक युवक धावत खेळपट्टीवर आला. त्याने कोहलीशी हस्तांदोलन करून आणि त्याच्या पाठीवर थोपटून त्याचे अभिनंदन केले.
महेंद्रसिंग धोनी बाद झाल्यानंतर स्टेडियममधील गर्दी ओसरू लागली.