मेलबर्न : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वॉने एकदिवसीय क्रिकेटमधील तीन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला अग्रस्थान दिले आहे. या सर्वोत्तम तिघांमध्ये त्याने इंग्लंडचा जोस बटलर आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांना स्थान दिले आहे.

कोहलीवर भारताच्या विश्वविजेतेपदाच्या आशा आहेत. त्याच्या खात्यावर ४१ शतके जमा असून, त्याची धावांची सरासरी ५९.५७ इतकी आहे. मार्कच्या यादीतील दुसरे स्थान इंग्लंडच्या जोस बटलरला जाते. त्याने साऊदम्पटनला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५० चेंडूंत शतक साकारले होते, तर त्याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध ७७ चेंडूंत १५० धावा केल्या होत्या. मार्कने तिसरे स्थान वॉर्नरला दिले आहे. चेंडू फेरफार प्रकरणामुळे झालेली एक वर्षांची बंदी भोगल्यानंतर तो दिमाखात स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवला आहे.