भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात दुहेरी हितसंबंधांचा ठपका मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी ठेवला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निती अधिकारी डी. के. जैन यांनी ही माहिती दिली.

गुप्ता यांनीच याआधी राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि कपिलदेव या माजी खेळाडूंविरोधात दुहेरी हितसंबंधांचा आरोप केला होता. कोहली हा भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि जोडीला एका कंपनीचा संचालकदेखील आहे. त्या कंपनीत अन्य उपसंचालक आहेत जे भारतीय क्रिकेट वर्तुळाशी संबंधित आहेत, असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमांनुसार एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक पदे भूषवता येत नाहीत, याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले.

‘‘माझ्याकडे कोहलीविषयी तक्रार आली आहे. त्याबाबत चौकशी केल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. गरज भासल्यास कोहलीकडून स्पष्टीकरण मागवू,’’ असे निती अधिकारी डी. के. जैन यांनी स्पष्ट केले.

कॉर्नरस्टोन वेंचर्स पार्टनर्स एलएलपीमध्ये कोहली हा संचालक आहे आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपनीत सहसंचालकांमध्ये आहे. विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपनीत अमित अरुण साजदेह (बंटी साजदेह म्हणून भारतीय क्रिकेट वर्तुळात ओळख) आणि बिनॉय भरत खिमजी हे सहसंचालक आहेत. हे दोघे कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट या कंपनीतही भागीदार आहेत, असा दावा गुप्ता यांनी कोहलीवर हितसंबंधांचा ठपका ठेवताना केला. अर्थातच कोहलीचा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट या कंपनीत सहभाग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहलीचे आर्थिक व्यवहार ही कंपनी पाहते.

‘‘विराट कोहलीने दोन पदे एकाचवेळी सांभाळत बीसीसीआयच्या नियम ३८ चे उल्लंघन केले आहे. बीसीसीआयच्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता मिळालेली आहे. या स्थितीत कोहलीने एका पदाचा राजीनामा द्यायला हवा,’’ असे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे. जैन यांना गेल्याच महिन्यात निती अधिकारी पदासाठी एका वर्षांची मुदत वाढवून देण्यात आली होती. ही मुदतवाढ दिल्यानंतर जैन यांच्याकडे प्रथमच मोठय़ा खेळाडूच्या नावाची तक्रार आली आहे. याआधी द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि कपिलदेव या माजी खेळाडूंनाही दुहेरी हितसंबंधांच्या आरोपांना सामोरे जावे लागले होते.