गुणवान खेळाडूंना हेरणारे अशी भारताच्या क्रिकेट विश्वात भारताचे माजी राष्ट्रीय निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांची ओळख आहे. क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून वेंगसरकर यांनी कारकीर्द गाजवलीच. मात्र त्याच जोडीला एक उत्तम प्रशासक असल्याचे त्यांनी दाखवले. महेंद्रसिंह धोनीची कर्णधारपदी वर्णी लावणे किंवा विराट कोहलीची लहान वयातच गुणवत्ता ओळखणे आणि त्याला पुढे संधी देणे यात वेंगसरकर यांचे मोलाचे योगदान आहे.

‘‘गुणवत्ता हेरणे हा माझ्यातील गुण आहे. फक्त गुणवत्ता ओळखूनच नाही तर पुढे आपण त्या गुणवत्तेला कसा न्याय देतो याला महत्त्व आहे. जर एखाद्यामधील गुणवत्ता ओळखली तर त्याला संधी दिली पाहिजे,’’ असे वेंगसरकर यांनी सोमवारी त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त सांगितले.

‘‘भारताच्या उदयोन्मुख संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. त्यावेळेस माझ्या सांगण्यावर कोहली सलामीवीर म्हणून खेळण्यास तयार झाला होता. त्याची जिद्द मला आवडली. निवड समिती प्रमुख होण्याआधी गुणवत्ता शोध सुधारणा मोहिमेचे प्रमुखपदही त्यावेळेस माझ्याकडे होते. परिणामी १६ आणि १९ वर्षांखालील संघाकडूनही त्याला खेळताना मी अनेक वेळा पाहिले. ज्यावेळेस राष्ट्रीय निवड समितीचा प्रमुख झालो त्यावेळेस उदयोन्मुख संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मी कोहलीची निवड केली. त्यावेळेस त्याला ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना पाहूनच त्याचा भविष्यकाळ मला दिसला होता,’’ असे २००६-०८ या काळात निवड समिती प्रमुख असलेल्या वेंगसरकर यांनी सांगितले.

‘‘कोहली किती वर्षे खेळेल हा विचार मी त्यावेळेस केला नसला तरी त्याच्यातील विलक्षण, असामान्य गुणवत्ता मला दिसली होती. प्रत्येक निवड समिती सदस्याकडे खेळाडूमधील गुणवत्ता शोधून धाडसाने त्याची निवड करण्याची क्षमता असली पाहिजे. कोहलीची निवड करताना त्यामुळेच मी कोणत्याही दडपणाखाली नव्हतो,’’ असे वेंगसरकर म्हणाले.