काही वेळा एका खेळाडूमध्ये आपण दुसऱ्या खेळाडूचे कलागुण पाहत असतो. पण एखाद्या खेळाडूमध्ये एकापेक्षा जास्त खेळाडूंच्या गुणवत्तेचे मिश्रण पाहायला मिळते, असेच काहीसे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी व्यक्त केले आहे. विराट कोहलीकडे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग या तीनही फलंदाजांचे कौशल्य आहे, अशा शब्दांत क्रो यांनी कोहलीचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाच्या पुनर्बाधणीमधील कोहली हा महत्त्वाचा घटक आहे. कोटय़वधी लोकांपुढील आदर्श खेळाडू व खरा युवा नेता होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्याच्याकडे आहेत, असे सांगतानाच क्रो म्हणाले की, कोहलीकडे द्रविडसारखी एकाग्रता, सचिनसारखी नजाकत, सेहवागसारखी आक्रमक फटकेबाजीची शैली असे नानाविध गुण आहेत. त्याखेरीज त्याचीही एक मुलखावेगळी स्वतंत्र शैली आहे. सचिन, राहुल व सेहवाग यांची जागा घेणारे युवा फलंदाज सध्या भारतीय संघात आले आहेत. या युवा खेळाडूंचा कोहली हा नेता असून या युवा खेळाडूंकडून संघासाठी अपेक्षित असलेली कामगिरी करून घेण्याची जबाबदारी कोहलीवर आहे.
 क्रो पुढे म्हणाले, रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक म्हणून काम करताना मी कोहलीची शैली अतिशय जवळून पाहिली आहे. सहकाऱ्यांवर प्रेम करण्यात व त्यांचे स्वभाव ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याबाबतही कोहली हा चतुरस्र खेळाडू आहे.