विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत कसोटी आणि वन-डे मालिकेत पराभवाचा धक्का दिला. त्याच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं आहे. कोहली वन-डे क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू असल्याचं क्लार्कने म्हटलंय. 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवत ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केला.

अवश्य वाचा – इंग्लंड लायन्स विरुद्ध अजिंक्य रहाणे भारत अ संघाचा कर्णधार

कोहली सध्या कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. “माझ्या दृष्टीने विराट कोहली हा आताच्या घडीला वन-डे क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू आहे. भारतासाठी ऑस्ट्रेलियात त्याने जी काही कामगिरी केली आहे, ती पाहिल्यानंतर माझ्या मनात काही शंकाच उरलेली नाहीये.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत क्लार्क बोलत होता. प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळायचा ही विराट कोहलीची जिद्द खरंच दाद देण्यासारखी आहे. त्याचा मैदानातला स्वभाव थोडा आक्रमक आहे, मात्र त्याच्या मेहनतीवर आणि हेतूवर कोणीही शंका घेऊ शकत नाही, क्लार्क विराटच्या फलंदाजीचं कौतुक करत होता.

अवश्य वाचा – जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम यॉर्कर टाकणारा बुमराह एकमेव – वासिम अक्रम

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत 5 वन-डे सामन्यांसह 3 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं मैदान मारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘विराट’सेना कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : मालिका विजयासोबत भारतीय संघाच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद