सनरायझर्सविरुद्ध आज सामना; कोहलीच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा परीक्षा
एकापेक्षा एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा संघ विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरूचा पहिला सामना मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० कर्णधारपदाची आशा असलेल्या विराट कोहलीची बंगळुरूचे नेतृत्व करताना परीक्षाच असणार आहे. कारण बंगळुरूला आतापर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. त्यामुळे कोहली विजयी सलामी देऊन संघाला जेतेपद पटकावून देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
बंगळुरूचा संघ २००९ आणि २०११ साली स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. पण दोन्ही वेळा त्यांना उपविजेत्यापदावरच समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात विराट स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तो चांगल्या फॉर्मात असून संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. ख्रिस गेल, शेन वॉटसन, ए बी डि’व्हिलियर्ससारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तारे या संघात आहेत,
त्यांच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल. विश्वचषकात यशस्वी ठरलेला वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्री त्यांच्या गोलंदाजीचे मुख्य
अस्त्र असेल. वरुण आरोनसारखा वेगवान गोलंदाज बंगळुरूच्या ताफ्यात आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाला आतापर्यंत लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. वॉर्नर आणि शिखर धवन ही सलामीची जोडी यशस्वी ठरताना दिसलेली नाही. धवनचा फॉर्म ही संघासाठी चिंतेची बाब आहे. युवराज सिंगसारखा जिगरबाज फलंदाज या वेळी हैदराबादने आपल्या संघात घेतला असून त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य करण्याबरोबर अन्य गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा आशीष नेहरा हैदराबादच्या गोलंदाजीचा कणा असेल. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या अनुभवाचा फायदा हैदराबादच्या संघाला होऊ शकतो.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.

संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ए बी डि’व्हिलियर्स, डेव्हिड विस, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस गेल, स्टुअर्ट बिन्नी, केन रिचर्डसन, सॅम्युअल बद्री, ट्रेव्हिस हेड, प्रवीण दुबे, विक्रमजित मलिक, इक्बाल अब्दुल्ला, सचिन बेबी, अक्षय कर्णेवार, विकास टोकस, के.एल. राहुल, परवेझ रसूल, अबु नचिम, हर्षल पटेल, केदार जाधव, मनदीप सिंग, सर्फराझ अहमद, एस. अरविंद, वरुण आरोन, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, केन विल्यमसन, आदित्य तरे, रिकी भूई, ट्रेंट बोल्ट, मोइसेस हेनरिक्स, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, मुस्तफिझुर रेहमान, नमन ओझा, कर्ण शर्मा, युवराज सिंग, आशीष नेहरा, टी. सुमन, आशीष रेड्डी, बिपुल शर्मा, बेन कटिंग, भुवनेश्वर कुमार, इऑन मॉर्गन, विजय शंकर, बरिंदर सरण.