भारतीय संघातील काही खेळाडूंनी विराटला त्याच्या मैदानातील चुका दाखवून दिल्या पाहिजेत, असे मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्वभूमीवर सेहवागने विराट कोहलीच्या चुकांवर बोट ठेवले. यापूर्वी सेहवागने विराटला संघ निवडीच्या मुद्द्यावरूनही लक्ष्य केले होते.

भारतीय संघातील काही खेळाडुंनी पुढाकार घेऊन विराट कोहलीला त्याच्या मैदानातील चुकांची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक संघात कर्णधाराला सल्ला देणारे चार ते पाच खेळाडू असतात. त्यामुळे मैदानातील चुका टळू शकतात. मात्र, सध्याच्या भारतीय संघात विराटला सल्ला देऊ शकणारा एकही खेळाडू उरलेला नाही. संघ निवडीच्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये कोणीही विराटच्या निर्णयाला आव्हान देत नाही. कारण, सध्याच्या संघातील एकही खेळाडू विराटच्या बरोबरीचा नाही. त्यामुळे कोणताही खेळाडू विराटला सल्ला द्यायच्या फंदात पडत नाही.

मात्र, यामुळे विराटच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. विराट संघातील अन्य खेळाडुंकडूनही स्वत:प्रमाणे कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगतो. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत येऊन फलंदाजी करायची क्षमता विराटमध्ये आहे. मात्र, इतर भारतीय फलंदाज अजून त्या स्तरावर पोहोचलेले नाहीत. मात्र, विराट त्यांच्याकडून आपल्याप्रमाणेच निडरपणे खेळण्याची अपेक्षा करतो. परंतु तसे घडत नसल्यामुळे विराटच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असे सेहवागने सांगितले.

अंडर १९ वर्ल्डकप: पाक सेमीफायनलमध्ये, भारताशी भिडणार?

याशिवाय, त्याला प्रशिक्षकांकडून काही सल्ले मिळत असतील. मात्र, मैदानात गेल्यावर विराट त्या गोष्टी अंमलात आणत नाही, अशी टीकाही सेहवागने केली. त्यामुळे विराटने आगामी कसोटीसाठी सगळ्यांसोबत एकत्र बसून रणनीती ठरवणे गरजेचे आहे. कारण एकटा खेळाडू संघाला कधीच विजयी करू शकत नाही. त्यासाठी सांघिक प्रयत्नांचीच गरज असते, असे सेहवागने सांगितले. दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र विराट कोहलीची पाठराखण केली आहे. विराटच्या नेतृत्वाबद्दल निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. थोडा धीर धरा, असा सल्ला गांगुलीनं टीकाकारांना दिला आहे.

इंग्लंडमध्ये धावा काढल्या तरच विराट कोहलीला सर्वोत्तम मानता येईल – मायकल होल्डींग