भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी आता ब्रिस्बेनऐवजी अ‍ॅडलेड असणार आहे. सिडनीच्या घटनेने फिलिप ह्युजेसला हिरावून नेले, अन्यथा रविवारी त्याचा २६ वा वाढदिवस होता. सध्या दोन्ही संघ या घटनेतून सावरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ह्युजेसचे सध्याचे निवासस्थान असलेल्या अ‍ॅडलेडला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होऊ शकेल. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत येथे दुसरी कसोटी होणार होती.
ह्युजेसच्या पार्थिवावर बुधवारी न्यू साऊथ वेल्स शहरातील मॅक्सव्हिले येथील त्याच्या शाळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ब्रिस्बेन कसोटी ४ डिसेंबरपासून सुरू होणार होती; परंतु आता ती अ‍ॅडलेड आणि मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर) कसोटीदरम्यानच्या काळात खेळवण्यात येईल. यानंतर ३ ते ७ जानेवारी या कालावधीत तिसरा कसोटी सामना होईल आणि मग १६ जानेवारीपासून तिरंगी एकदिवसीय स्पर्धा होणार आहे.

शनिवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन कसोटी सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ह्युजेसच्या दु:खातून सावरण्यासाठी खेळाडूंना अधिक वेळ मिळावा, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भावनिकदृष्टय़ा या सामन्यासाठी सज्ज नाहीत. या कठीण काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आमच्याशी छान सहकार्य केले, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले.

अंत्यसंस्काराला कोहली, शास्त्री, फ्लेचर हजर राहणार
अ‍ॅडलेड : भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार विराट कोहली, संचालक रवी शास्त्री, प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि व्यवस्थापक अर्शद अयुब ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्युजेसच्या बुधवारी होणाऱ्या अंत्यसंस्काराला हजर राहणार आहेत. भारतीय संघ सोमवारी ब्रिस्बेनला पोहोचणार असून, यानंतर मॅक्सव्हिलेला कोणी जायचे याबाबत निर्णय होईल.