30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन-डे सामन्यांची मालिका खेळतो आहे. यानंतर भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे खेळाडूंचं व्यस्त वेळापत्रक पाहता कर्णधार विराट कोहलीने आपल्या सहकाऱ्यांना, आयपीएलदरम्यान वाईट सवयी लावून घेऊ नका अशी सक्त ताकीद दिली आहे.
“जे खेळाडू विश्वचषक संघाचा हिस्सा असणार आहेत, त्यांनी आगामी काळात आपल्यावर क्रिकेटचा अतिताण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आयपीएलदरम्यान आपल्या सर्वांना वाईट सवयींपासून दूर रहावं लागणार आहे. मी स्वतः माझ्या वेळापत्रकात कोणताही बदल करणार नाही. विश्वचषकासाठी जे 15 खेळाडू निवडले जातील त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन इंग्लंडला जाणं माझ्यासाठी गरजेचं आहे.” विराट पहिल्या टी-20 सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता.
स्वतःवर नियंत्रण ठेवणं या सर्व खेळाडूंना शिकावं लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही नेट्समध्ये सराव करत असताल तेव्हा स्वतःच्या शैलीमध्ये असा कोणताही बदल करु नका ज्यामुळे तुमचा फॉर्म बिघडले. आताच्या घडीला तुमचा फॉर्म हरवून बसलात तर पुनरागमन करणं कठीण जाईल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचंही विराट म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 2:13 pm