ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पंच पुनर्आढावा पद्धतीच्या (डीआरएस) अयोग्य निर्णयांचा फटका सहन करावा लागल्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीने या प्रणालीवरच टीका केली आहे.

‘डीआरएस’ प्रणालीत सातत्याचा अभाव जाणवतो. रविवारच्या सामन्यात अ‍ॅश्टन टर्नर हा यष्टय़ांमागे झेलबाद झाल्याचा चुकीचा निर्णय देण्यात आला. हाच निकाल सामन्याला कलाटणी देणारा ठरला, अशा शब्दांत कोहलीने या प्रणालीवर टीका केली.

४४व्या षटकामध्ये यजुर्वेद्र चहलच्या चेंडूवर टर्नरच्या बॅटची खालची कड लागून उडालेला झेल पंतने टिपत यष्टय़ा उधळून पंचांकडे अपील केले. मात्र यष्टीचीतचे अपील पंचांनी फेटाळल्यानंतर पंतने झेलबादसाठी ‘डीआरएस’द्वारे दाद मागण्याची विनंती कोहलीला केली. त्यावर तिसरे पंच जोएल विल्सन यांनी भारताचे अपील अयोग्य ठरवले. मात्र, प्रत्यक्षात तो चेंडू बॅटची खालची कड घेऊन आला होता. तरीदेखील बादचा निर्णय दिला न गेल्याने कोहलीने मान हलवत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी टर्नर हा ४१ धावांवर खेळत होता. तसेच ऑस्ट्रेलियाला ३९ चेंडूंमध्ये ६६ धावांची गरज होती. त्यानंतर टर्नरने तुफानी फलंदाजी करत सामना भारताच्या हातून खेचून घेतला, असेही कोहलीने नमूद केले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.