विराट कोहलीने २०१२ मध्ये आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानविरुद्ध साकारलेली १८३ धावांची खेळी ही क्रिके टच्या तिन्ही प्रकारांत भारतीय कर्णधाराने केलेली सर्वोत्तम खेळी होती, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.

पाकिस्तानचे ३३० धावांचे लक्ष्य गाठताना कोहलीने १४८ चेंडूंत २२ चौकार आणि १ षटकारासह १८३ धावांची खेळी करत भारताला सहा बळी राखून विजय मिळवून दिला होता. ‘‘कोहलीने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अनेक अविस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. पण त्याची १८३ धावांची खेळी ही सर्वार्थाने सर्वोत्तम होती. या सामन्यात भारताने शून्यावरच बळी गमावला होता. त्यावेळी पाकिस्तानचा संघही सर्वोत्तम होता. तसेच कोहलीचा अनुभवही तोकडा होता,’’ असे गंभीरने सांगितले.

कोहलीच्या अटके साठी न्यायालयात धाव

चेन्नई : विराट कोहलीला अटक करण्यात यावी, अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोहली आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया जाहिरातीद्वारे जुगाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप चेन्नईतील एका वकिलाने केला आहे. कोहली आणि तमन्ना मोबाइल प्रीमियर लीगची (एमपीएल) जाहिरात करून युवा पिढीची दिशाभूल करत आहेत. यामुळे तरुणांना जुगार खेळण्याची सवय लागत असून अनेक जण यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. म्हणून कोहलीसह तमन्नाला अटक करण्यात यावी, असे त्या वकिलाने सांगितले. त्याशिवाय एका तरुणाने या अ‍ॅपसाठी पैसे उसने घेऊन वेळेत ते फेडू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याचा दाखलाही याचिकाकर्त्यांने दिला आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार पुढील आठवडय़ात याचिका सुनावणीसाठी घेण्यात येईल, असे समजते.