News Flash

चॅम्पियन!; कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकला ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचे विजेतेपद

कोल्हापूरच्या मातीतला गडी, पडला सर्वांवर भारी

कृष्णराज महाडिक

ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे तब्बल १९ वर्षांनंतर भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. सातासमुद्रापार जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवणाऱ्या कृष्णराजचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे.

कोल्हापुरच्या मातीत तयार झालेल्या खेळाडूंनी पारंपारिक खेळांच्या बरोबरीने विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. नेमबाजी, जलतरण यासह रेसिंगमध्येही कोल्हापूरच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण केला आहे. रेसिंग म्हणजे वाहनचालकाचा कस पाहणारा, कौशल्य पणाला लावायला लावणारा साहसी क्रीडा प्रकार. अत्यंत वेगाने धावणाऱ्या गाड्या, प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठीची चढाओढ आणि क्षणाक्षणाला बदलणारे विजेतेपदाचे चित्र हे रेस ट्रॅकवरचे चित्र असते.

कोल्हापुरचा युवक रेसिंग ट्रॅकवरील या परिस्थितीत इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बी.आर.डी.सी. ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत उतरतो आणि त्यातील एक रेस जिंकतो, ही कोल्हापूरसाठी अत्यंत अभिमानाची बाब बनली आहे. खासदारपुत्र कृष्णराज धनंजय महाडिकने ही किमया साधली आहे. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर कृष्णराजच्या रुपाने या मानाच्या स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या रेसरला मिळाले आहे.

गेली ८ वर्षे कृष्णराज कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहे. गो कार्टिंगमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभागी होत आहे. गेल्या वर्षी अत्यंत प्रभावी कामगिरी केल्यानंतर यंदाच्या हंगामात, टीम डबल आर रेसिंग या संघाकडून खेळताना कृष्णराजने इतिहास रचला. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली. पहिल्या रेसमध्ये ८ व्या स्थानावर असताना, कृष्णराजने जिद्द, कौशल्य आणि समयसूचकतेचा वापर करत सर्वच प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. रेस संपायला अवघे काही क्षण उरले असताना त्याने जेम्स पूल या रेसरला मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली.

कृष्णराजने त्याच्या या यशाचे श्रेय आई अरुंधती महाडिक, वडिल खासदार धनंजय महाडिक यांना तसेच डबल आर रेसिंगचे मॅनेजर रुपर्ट कुक आणि जॅक क्लार्क यांना दिले आहे. या रेसची तयारी करण्याच्या हेतूने कृष्णराज चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. नियमित व्यायाम, कसून सराव आणि एकाग्रतेसाठी योगा या त्रिसूत्रीमुळे आपल्याला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया कृष्णराजने दिली. या महिनाअखेरीस होणाऱ्या रेसमध्ये अशीच कामगिरी नोंदविण्यासाठी तो उत्सुक असून त्या दृष्टीने त्याची जोरदार तयारी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 10:34 pm

Web Title: kolhapurs krishnaraj mahadik wins british formula three championship
Next Stories
1 एस. श्रीशांतला दिलासा, हायकोर्टाने बंदी उठवली
2 जेव्हा विराट कोहली ‘द ग्रेट खली’ला भेटतो…
3 विराट कोहली आणि शिखर धवनने असा साजरा केला फ्रेंडशिप डे
Just Now!
X