उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे.

30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले आहेत. त्याने 2012च्या हंगामात पदार्पण केले. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

2018च्या आयपीएल हंगामात गुरकीरतला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पदार्पणानंतरपासून तो प्रत्येक हंगामात कमीतकमी दोन सामने खेळला आहे. या काळात त्याने 511 धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावताना गोलंदाजीत 2 बळी घेतले आहेत. 2016चा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरला. या काळात त्याने 7 सामन्यांत 113 धावा केल्या आणि दोन गडी बाद केले. कोलकाता नाइट रायडर्सने गुरकीरतसिंग मानला 50 लाखांच्या बेस प्राइसमध्ये संघात घेतले आहे.

 

केकेआर संघाचा कर्णधार ईऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, साकिब अल हसन, सुनील नरिन आणि पॅट कमिन्स हे दिग्गज खेळाडू आहेत. गुरकीरतसिंग मानकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, कारण आयपीएलच्या कोणत्याही मोसमात तो जास्त चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

आयपीएलच्या चौदाव्या मोसमात केकेआरचा पहिला सामना 11 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी चेन्नईत रंगणार आहे.