पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय; अर्धशतकवीर उथप्पा सामनावीर
भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याने सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सलामीवीर रॉबिन उथप्पाला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कोलकाताने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण करत त्यांना १३८ धावांवर रोखले. भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकातान्याने पंजाबच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. पण शॉन मार्शने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारल्यामुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना उथप्पा आणि कर्णधार गौतम गंभीर (३४) यांनी ८२ धावांची सलामी दिली. उथप्पाने यावेळी २८ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १३८ (शॉन मार्श नाबाद ५६; सुनील नरिन २/२२, मॉर्ने मॉर्केल २/२७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १७.१ षटकांत ४ बाद १४१ (रॉबिन उथप्पा ५३, गौतम गंभीर ३४; प्रदीप साहू २/१८, अक्षर पटेल २/१९)
सामनावीर : रॉबिन उथप्पा.