जबरदस्त सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदाच्या हंगामात स्वप्नवत वाटचाल केली आहे. नऊपैकी आठ लढतींत विजय मिळवत घोडदौड करणाऱ्या पंजाब संघाचा विजयरथ कोलकाता नाइट रायडर्सने रोखला आहे. सातत्याचा अभाव असणाऱ्या नाइट रायडर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्सनी आश्चर्यकारक विजयाची नोंद केली. या पराभवामुळे पंजाबला हरवण्याची गुरुकिल्ली अन्य संघांना मिळाली आहे.
कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऐन भरात असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांचा समावेश असलेल्या पंजाबच्या संघाला फलंदाजी देण्याचा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता; परंतु नाइट रायडर्सच्या सर्वच गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पंजाबच्या फलंदाजांना माघारी धाडले. भारतीय संघात परतण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या अनुभवी वीरेंद्र सेहवागने ७२ धावांची खेळी करत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. मॅक्सवेल १४, तर मिलर १३ धावा करून तंबूत परतले. नाइट रायडर्सच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पंजाबने १४९ धावांची मजल मारली. आधीच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग असलेल्या पीयूष चावलाने १९ धावांत ३ बळी घेतले.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी ६८ धावांची खणखणीत सलामी देत नाइट रायडर्सच्या विजयाचा पाया रचला. ८ चौकार आणि एका षटकारासह २८ चेंडूंत ४६ धावा करून उथप्पा बाद झाला. यानंतर गंभीरने सामन्याची सूत्रे हाती घेत नाइट रायडर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गंभीरने ७ चौकारांसह ४५ चेंडूंत ६३, तर मनीष पांडेने ३५ चेंडूंत ३६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १४९ (वीरेंद्र सेहवाग ७२, पीयुष चावला ३/१९, मॉर्ने मॉर्केल २/२०) पराभूत विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : १८ षटकांत १ बाद १५० (गौतम गंभीर नाबाद ६३, रॉबिन उथप्पा ४६, परविंदर अवाना १/२०)
सामनावीर : गौतम गंभीर</strong>