उत्कंठापूर्ण लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघावर तीन चेंडू व दोन विकेट्स राखून मात केली. त्यामुळे घरच्या मैदानावर आयपीएल स्पर्धेत पुण्याला पुन्हा पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली.

कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेकजिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना पुण्याने २० षटकांत ५ बाद १६० धावा केल्या. त्यामध्ये सलामीवीर अजिंक्य रहाणेने केलेल्या ६७ धावांचा सिंहाचा वाटा होता. त्याने स्टीव्हन स्मिथच्या साथीने ५६ धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच स्मिथ ३१ धावांवर धावबाद झाला.  शेवटच्या तीन षटकांमध्ये पुण्याने ४१ धावांची भर घातली. त्यामध्ये अल्बी मोर्कल (१६) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद २३) यांच्या आक्रमक फटकेबाजीचा समावेश होता.

धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता संघाने रॉबिन उथप्पा (०), गौतम (११) व शकीब हसन (३) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव व युसुफ पठाण यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत  ७.५ षटकांत ५१ धावांची भर घातली. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताला ४२ धावांची आवश्यकता होती. आंद्रे रसेल व आर. सतीश यांनी आक्रमक फटकेबाजी करीत कोलकात्याचा विजय समीप आणला. शेवटच्या षटकांत त्यांना सात धावांची गरज होती. उमेश यादवने परेराच्या गोलंदाजीवर षटकार खेचला व विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

संक्षिप्त धावफलक

पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ५ बाद १६० (अजिंक्य रहाणे ६७, स्टीव्हन स्मिथ ३१) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.३ षटकांत ८ बाद १६२   (सूर्यकुमार यादव ६०, युसुफ पठाण ३६; रजत भाटिया २/१९, परेरा २/२८)

सामनावीर : सूर्यकुमार यादव