कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आज सामना
सलामीच्या सामन्यात पुणे रायजिंग सुपरजायंट संघाकडून दारुण पराभव पत्करल्यावर आता दुसऱ्या सामन्यात विजयाची आशा मुंबई इंडियन्सने उराशी बाळगली आहे. इडन गार्डन्सवर मुंबईचा दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्सबरोबर होणार असला तरी त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल ते फिरकीपटू सुनील नरिनचे. वडिलांच्या निधनामुळे नरिनला मायदेशी परतावे लागले होते. पण आता तो आयपीएलसाठी कोलकात्याच्या संघात परतला असून मुंबईच्या रडारवर तोच अग्रस्थानी असेल.
घरच्या मैदानातील पहिल्याच सामन्यात मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल हाराकिरी पाहायला मिळाली होती. मुंबईने पहिल्या पाच षटकांमध्येच अव्वल पाच फलंदाज गमावल होते, तर १६ व षटकात त्यांची ७ बाद ६८ अशी दयनीय अवस्था होती. इडन गार्डन्स हे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी सुदैवी ठरलेले आहे, पण हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागेल. विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंडय़ा यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत.
कोलकाताच्या संघाने पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहज विजय मिळवला होता. ब्रॅड हॉग, पीयूष चावला यांनी चांगला फिरकी मारा केला होता आणि आता त्यांच्या साथीला नरिनसारखा अव्वल फिरकीपटू असेल. फलंदाजीमध्ये कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा हे चांगली सलामी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल.
एकीकडे पहिल्या सामन्यात कोलकात्याने नऊ विकेट्सने विजय मिळवला असून दुसरीकडे मुंबईला ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबईपेक्षा कोलकात्याचे मनोबल उंचावलेले असेल. त्याचबरोबर हा सामना त्यांच्या घरच्या मैदानात होणार असल्याचा फायदाही त्यांना होईल. सध्याच्या घडीला मुंबईपेक्षा कोलकात्याचे पारडे नक्कीच जड आहे, पण गतविजेता मुंबईचा संघ कधीही धक्का देऊ शकतो.

संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमोन्स, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पंडय़ा, हरभजन सिंग, कोरे अँडरसन, मिचेल मॅक्लेघन, जोस बटलर, उन्मुक्त चंद, र्मचट डी लँग, सिद्धेश लाड, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, टीम साऊथी, जगदीश सुचित, आर. विनय कुमार, कृणाल पंडय़ा, नथू सिंग, अक्षय वाखरे, नितीश राणा, जितेश शर्मा, किशोर कामत आणि दीपक पुनिया.
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, पीयूष चावला, कुलदीप यादव, मनन शर्मा, अंकित राजपूत, राजगोपाल सतीश, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हॅस्टिंग, ब्रॅड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, ख्रिस लिन, मॉर्ने मॉर्केल, सुनील नरीन, कॉलिन मुर्नो, आंद्रे रसेल आणि शकिब अल हसन.
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून. प्रक्षेपण : सोनी सिक्स, सेट मॅक्स