चुरशीच्या अंतिम मुकाबल्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर थरारक विजय मिळवत कोलकाता नाइट रायडर्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. कोलकाता शहराची शान वाढवणाऱ्या या यशाचे यथासांग कौतुक करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचे घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्सवर संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात येणार आहे.
मंगळवारी सर्व रस्ते ईडन गार्डन्सच्या दिशेने गर्दी करणारे असतील. या शानदार सोहळ्यासाठी सर्वाना प्रवेश खुला असल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव सुबीर गांगुली यांनी सांगितले. ईडन गार्डन्स स्टेडियमची प्रवेशद्वारे सकाळी ११.३० वाजता चाहत्यांसाठी खुली असतील. संघाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे येथे स्वागतच असेल. नाइट रायडर्सचा विजय आणखी संस्मरणीय करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रमुख जगमोहन दालमिया आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दोन वर्षांपूर्वी नाइट रायडर्स संघाने जेतेपद पटकावल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारने संघाला सुवर्णपदके, सुवर्णमालांनी सन्मानित केले होते. त्यांच्या या कृतीवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर ममता सरकार कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कसा गौरव करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान अंतिम लढत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाइट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खानला दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या. हुगळी नदीच्या किनारी समस्त कोलकातावासीयांनी विजयाच्या जल्लोषासाठी सज्ज राहावे, असे आवाहन शाहरुख खानने केले आहे.
जेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरूत रात्री उशिरापर्यंत नाइट रायडर्स संघाचा विजयी जल्लोष सुरू होता.