आयपीएल गुणतालिकेत द्वितीय स्थानावर विराजमान असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत करण्याची किमया साधणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचा आत्मविश्वास आता उंचावला आहे. विजयाचे हेच क्षण कायम राखण्याचे आव्हान कोलकातासमोर असतील. बुधवारी कोलकाताची गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाशी गाठ पडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मिळवलेल्या विजयामुळे या सामन्यात कोलकाताचे पारडे जड मानले जात आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सातव्या आयपीएल मोसमात झगडताना आढळत आहे, परंतु बलाढय़ पंजाबविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे ते आता स्पध्रेत रुबाबामध्ये वावरू लागले आहेत. गुणतालिकेत सध्या कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर आहे. नऊ सामन्यांपैकी चार विजय आणि पाच पराजय अशी त्यांची कामगिरी. पण ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवणे कोलकातासाठी मुश्कील मुळीच नाही.
कोलकाताची फलंदाजीची फळी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात प्रकर्षांने दिसून आली. टिकेच्या लक्ष्यस्थानी असलेला कर्णधार गौतम गंभीर जबाबदारी खेळला आणि या लागोपाठच्या विजयांमध्ये आपल्या अर्धशतकांचे योगदान दिले. रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांनीही या दोन सामन्यांत चांगली फलंदाजी केली.
गोलंदाजांनीही कमाल करताना पंजाबसारख्या फॉर्मात असलेल्या संघाला फक्त ८ बाद १४९ धावसंख्येवर वेसण घातली. मॉर्नी मॉर्केल आणि पियूष चावलाला संघात स्थान देण्याचा कोलकाताचा निर्णय अतिशय फलदायी ठरला. या दोघांनी मिळून पंजाबचा निम्मा संघ गुंडाळला. याचप्रमाणे जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिनपासून मुंबई इंडियन्सला सावध राहावे लागणार आहे.
दुसरीकडे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नऊ सामन्यांत फक्त  ३ विजय मिळवता आलेले आहेत. प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकण्याची नितांत गरज आहे. कर्णधार रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड आणि अंबाती रायुडू यांची सातत्यपूर्ण फलंदाजी मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल.