यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सात सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे ते बाद फेरीत पोहोचतील, अशीही आशा बऱ्याच जणांना नव्हती. पण स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये एकामागून एक विजय मिळवत कोलकात्याने सातव्या पर्वाचे जेतेपद पटकावले आणि याचे श्रेय कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर याने संघाला दिले आहे. ‘‘पहिल्या सात सामन्यांमध्ये आमची कामगिरी चांगली नव्हती. तेव्हा काही जणांना आम्ही अंतिम फेरीत पोहोचू असे वाटले नव्हते. संघामध्ये प्रचंड दडपणाचे वातावरण होते. पण संघातील सर्व खेळाडूंनी झोकात पुनरागमन केले, त्यामुळे या विजयाचे श्रेय संघातील सर्व खेळाडूंना आहे,’’ असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.
अंतिम फेरीत किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकात्यापुढे २०० धावांचे आव्हान ठेवले होते. याबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला की, ‘‘चिनास्वामी हे फार मोठे मैदान नाही. त्यामुळे या मैदानात मोठे आव्हानही पार करू शकतो, हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे ५ षटकांमध्ये आम्हाला चांगली सुरुवात करून ५० धावा करता आल्या.
मनीष पांडेने अफलातून खेळी साकारली, युसूफनेही दणक्यात फलंदाजी केली आणि चावलानेही विजयी फटका लगावल्याने आम्ही जेतेपदाला गवसणी घातली. वृद्धिमानची खेळी अप्रतिम अशीच होती, पण मनीषची खेळी झंझावाती होती.

कोलकात्यामध्ये जल्लोष
विजयासाठी चार चेंडूंवर चार धावांची गरज असताना पीयुष चावलाने चौकार लगावला आणि कोलकात्यामध्ये एकच जल्लोष झाला. कोलकातावासीय रस्त्यांवर उतरले आणि जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी संघातील खेळाडूंचे पोस्टर्स घेऊन कोलकातावासीयांनी मिठाया वाटल्या.

सकारात्मक दृष्टिकोनामुळे जिंकलो – मनीष पांडे
हे वर्ष माझ्यासाठी अद्भुत असेच आहे. कारण यावर्षी माझ्या संघाने रणजी, इराणी आणि विजय हजारे करंडक पटकावला, त्यानंतर वर्षभरातील माझे हे चौथे विजेतेपद आहे. मला अटीतटीच्या सामन्यांमध्ये खेळायला आवडते, कारण तिथेच खेळाडूची कसोटी असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळेच मला ही खेळी साकारता आली आणि आम्ही जिंकू शकलो. डावाची सुरुवात चांगली होणे महत्त्वाचे असते, आम्ही पहिल्या दहा षटकांमध्ये महत्त्वाचे फलंदाज गमावले असले, तरी आम्ही प्रत्येक षटकामध्ये सरासरी दहा धावा करत राहिलो आणि त्यामुळेच आम्हाला विजय मिळवता आला.

संघासाठी कामी आल्याचा आनंद- उथप्पा
यंदाचे आयपीएल माझ्यासाठी खास ठरले, कारण सातत्याने माझ्याकडून धावा होत गेल्या आणि त्याचा फायदा संघाला झाला. मला ऑरेंज कॅप मिळाली, याचा आनंद तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त आनंद मला मी संघासाठी कामी आलो याचा आहे. या आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी विचाराल तर मला मुंबई इंडियन्सविरुद्धची वाटते. कारण त्या सामन्यामध्ये माझा पाय दुखावला होता, पण कसलीही तमा न बाळगता मी मैदानात उतरलो आणि चांगली खेळी साकारू  शकलो.