News Flash

कोलकाताच्या गोलंदाजांची अग्निपरीक्षा

आयपीएलच्या नवव्या हंगामात बंगळुरूच्या संघातील खेळाडूंनी आपल्या लक्षवेधी कामगिरी छाप पाडली आहे.

| May 16, 2016 02:46 am

आज सामना धडाकेबाज फलंदाजांच्या बंगळुरूशी

आयपीएल विजेतेपदावर दोनदा मोहर उमटवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने बाद फेरीचे स्वप्न साकारण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र सोमवारी धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी कोलकाताचा सामना असल्यामुळे त्यांच्या गोलंदाजांची ही अग्निपरीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे बंगळुरूची फलंदाजी विरुद्ध कोलकाताची गोलंदाजी असाच हा सामना रंगणार आहे.

कोलकाता आणि बंगळुरू हे दोन्ही संघ मागील सामन्यात विजय मिळवून आले असले तरी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही विजयाची नितांत आवश्यकता आहे. आयपीएल गुणतालिकेत सध्या कोलकाताचा संघ ११ सामन्यांतून १४ गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे बंगळुरूच्या विजयासह १६ गुणांचा जादूई आकडा गाठल्यास ते आरामात बाद फेरीसाठी पात्र होऊ शकतील. दुसरीकडे ११ सामन्यांतून १० गुण मिळवणाऱ्या बंगळुरूला आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकण्याची नितांत आवश्यकता आहे.

आयपीएलच्या नवव्या हंगामात बंगळुरूच्या संघातील खेळाडूंनी आपल्या लक्षवेधी कामगिरी छाप पाडली आहे. शनिवारी बंगळुरूने बलाढय़ गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली होती. विराट कोहली (५५ चेंडूंत १०९ धावा) आणि ए बी डी’व्हिलियर्स (५२ चेंडूंत नाबाद १२९ धावा) यांनी फक्त ९६ चेंडूंत २२९ धावांची भागीदारी रचण्याचा पराक्रम साधला. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ३ बाद २४८ ही नोंदली गेली. पुणे वॉरियर्सविरुद्ध २०१३मध्ये बंगळुरूनेच ५ बाद २६३ अशी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात जास्त एकंदर धावसंख्या नोंदवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली अग्रेसर आहे. त्याने ११ सामन्यांत ७५.२२च्या सरासरीने ६७७ धावा केल्या असून, अयापीएलमधील तिसरे शतक त्याने झळकावले. याच पंक्तीत डी’व्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यावर ५३८ धावा आहेत. हाच धोका ओळखून कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर फिरकीचे चक्रव्यूह रचण्याची शक्यता आहे. मात्र अतिशय दडपणाखालील स्थितीचा सामना करण्यात कोहली आणि डी’व्हिलियर्स हे दोघेही वाकबदार आहेत. ख्रिस गेलचा फॉर्म ही बंगळुरूसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्याने पाच डावांमध्ये फक्त १९ धावा केल्या आहेत.

पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमाचा वापर करावा लागलेल्या शनिवारच्या सामन्यात कोलकाताने रायझिंग पुणे सुपरजायंट्सला १७.४ षटकांत ६ बाद १०३ धावसंख्येवर रोखले. यात सुनील नरिन, शकिब अल हसन आणि पीयूष चावला या फिरकी त्रिकुटाचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर कोलकाताने आठ विकेट्स राखून आरामात विजय मिळवला. नरिन एकसुद्धा बळी मिळू शकला नव्हता. मात्र तयाने ३.४ षटकांत फक्त १० धावा दिल्या. त्याने टाकलेल्या १४ निर्धाव चेंडूंपैकी १० हे पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरुद्ध होते. धोनीला म्हणूनच २२ चेंडूंत फक्त नाबाद ८ धावा करता आल्या.

बंगळुरू संघाकडे युवेंद्र चहल हा मनगटी फिरकी गोलंदाज आहे. याशिवाय इक्बाल अब्दुल्ला आणि परवेझ रसूल यांच्यासारखे फिरकी गोलंदाज आहेत. याचप्रमाणे  वेगवान माऱ्याची धुरा शेन वॉटसन आणि ख्रिस जॉर्डन हिमतीने सांभाळत आहेत.

कोलकाताकडेही वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलसारखा विजयवीर आहे. युसूफ पठाणला सूर गवसला असून, त्याने १८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या आहेत.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 2:46 am

Web Title: kolkata knight riders vs royal challengers bangalore
Next Stories
1 कबड्डीत पैसा आहे, ही गोष्ट प्रेरणादायी!
2 ‘ला लिगा’वर बार्सिलोनाची मोहर
3 सुशील कुमारचे स्वप्न मावळले?
Just Now!
X