News Flash

गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्सचे पारडे जड

सामन्यात कोलकाताचे पारडे जड असले तरी हैदराबाद साखळीतील पराभवांचे उट्टे फेडण्यासाठी उत्सुक आहे.

| May 25, 2016 05:14 am

 

साखळीतील दोन पराभवांचे उट्टे फेडण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आज उत्सुक

आयपीएल विजेतेपद आता तीन पावलांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी ‘एलिमिनेटर’चा म्हणजेच बाद फेरीचा दुसरा सामना दोनदा आयपीएल विजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये होणार आहे. या सामन्यात कोलकाताचे पारडे जड असले तरी हैदराबाद साखळीतील पराभवांचे उट्टे फेडण्यासाठी उत्सुक आहे.

जो संघ हरणार तो बाद होणार आणि जिंकणार तो ‘क्वालिफायर-२’साठी पात्र होणार हे समीकरण दोन्ही संघांना ज्ञात आहे. आयपीएल साखळीच्या गुणतालिकेत कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांच्या खात्यांवर १६ गुण होते. मात्र हैदराबादची निव्वळ धावगती सरस ठरल्यामुळे गौतम गंभीरच्या संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोन्ही साखळी सामन्यांत हैदराबादला हरवल्यामुळे कोलकाताला विजयाची संधी अधिक मानली जात आहे. पहिल्या सामन्यात कोलकाताने आठ विकेट्स राखून विजय मिळवला, तर रविवारी दुसऱ्या सामन्यात २२ धावांनी विजय मिळवत बाद फेरीचे स्वप्न साकारले.

आयपीएलमध्ये कोलकाताची कामगिरी तुलनेने हैदराबादपेक्षा चांगली झाली आहे. शिवाय २०१२ आणि २०१४मधील विजेतेपद याचप्रमाणे २०११मध्ये ‘प्ले-ऑफ’पर्यंत मजल ही त्यांची कामगिरी निश्चितच नेत्रदीपक आहे. हैदराबादने याआधी फक्त २०१३मध्ये ‘प्ले-ऑफ’पर्यंत उंची गाठली होती.

कोलकाताच्या यशात सर्वाधिक धावा काढणारा कर्णधार गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वगळल्यानंतर निवड समितीला त्यांची चूक दाखवून देण्यासाठी गंभीर उत्सुक आहे. गंभीरने पाच अर्धशतकांसह १४ सामन्यांत ४७३ धावा केल्या आहेत. त्याचा सलामीवीर साथीदार रॉबिन उथप्पा (३८३ धावा) आणि युसूफ पठाण (३५९ धावा) यांच्या फलंदाजीचेही महत्त्वाचे योगदान आहे. परंतु या दोघांनाही निवड समितीने डावलले आहे. मात्र युवा फलंदाज मनीष पांडेला (११ सामन्यांत २१२ धावा) झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यालाही आपली निवड सिद्ध करण्याची संधी आहे. आंद्रे रसेलची दुखापत ही कोलकातासाठी चिंतेची बाब ठरत आहे. यंदाच्या हंगामात दोनदा सामनावीर पुरस्काराला गवसणी घालणारा रसेल मागील दोन सामन्यांत खेळू शकला नाही.

कोलकाताला यंदाच्या हंगामात फिरकी तारू शकली नव्हती. पण हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यांत सुनील नरिन आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेत आपली चुणूक दखवली आहे.

हैदराबादची मागील दोन सामन्यांत चांगली कामगिरी झालेली नाही. दिल्ली डेअरडेव्हिस आणि कोलकाताकडून त्यांनी हार पत्करली आहे. परंतु प्रथमच आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न पाहण्यासाठी हैदराबादला विजयाशिवाय पर्याय नाही.

गंभीरप्रमाणेच डेव्हिड वॉर्नर हा हैदराबादचा प्रेरणादायी संघनायक म्हणून प्रत्ययास येत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत हा ऑस्ट्रेलियन फलंदाज दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यांत ६५८ धावा केल्या आहेत. त्याचा सलामीवीर जोडीदार शिखर धवनसुद्धा फॉर्मात आहे. त्याने एकंदर ४६३ धावा केल्या आहेत.

हैदराबादकडे युवराज सिंग, मोझेस हेनरिक्स आणि ईऑन मॉर्गन यांच्यासारखे सामन्याचे चित्र पालटू शकणारे फलंदाज आहेत. मात्र अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचा मारा कमजोर झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारसह बरिंदर सरण आणि मुस्तफिझूर रहिम या डावखुऱ्या वेगवान गोलदाजांवर हैदराबादची मदार आहे.

संघ

कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शकिब अल हसन, पीयूष चावला, सुनील नरिन, जेसॉन होल्डर, मॉर्नी मॉर्केल, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, ब्रॅड हॉग, कॉलिन मुन्रो, शॉन टेट, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, मनन शर्मा, राजगोपाळ सतीश आणि जयदेव उनाडकट.

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, युवराज सिंग, मोझेस हेनरिक्स, ईऑन मॉर्गन, दीपक हुडा, नमन ओझा, कर्ण शर्मा, मुस्तफिझूर रहिम, भुवनेश्वर कुमार, बरिंदर सरण, रिकी भुई, बिपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, विजय शंकर, टी. सुमन, आदित्य तरे.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 5:14 am

Web Title: kolkata knight riders vs sunrisers hyderabad 2
Next Stories
1 मरे, व्हिनसचे संघर्षपूर्ण विजय
2 भारत बाद फेरीत; साखळीत दुसरे स्थान
3 भारतीय खेळाडूंसाठी पदकाचा मार्ग खडतर
Just Now!
X