सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आज अखेरचा साखळी सामना

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बाद फेरी गाठण्याच्या आशा शाबूत ठेवायच्या असतील तर कोलकाता नाइट रायडर्सला सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य आहे.

हैदराबादने १३ सामन्यांपैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेतील अव्वल स्थानासह बाद फेरीतील स्थान आधीच निश्चित केले आहे. हैदराबादने मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून १४ धावांनी पराभव पत्करला होता. मात्र तरीही सर्वाधिक १८ गुण खात्यावर असणाऱ्या हैदराबादला नमवणे कोलकातासाठी मुळीच सोपे नसेल.

दोन वेळा विजेता कोलकाताचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १३ सामन्यांत ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. त्यामुळे हा विजय त्यांचे बाद फेरीतील स्थान नक्की करणारा असेल.

बेंगळूरुविरुद्धच्या खराब कामगिरीतून धडे घेण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. वेगवान गोलंदाज बॅसिल थम्पीने चार षटकांत ७० धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. याआधीचा इशांत शर्माचा विक्रम त्याने मोडीत काढला. त्यामुळे थम्पीला संघात स्थान मिळवणे कठीण असेल.

यंदाच्या हंगामात एकूण सहाशेहून अधिक धावा खात्यावर असणारा कर्णधार केन विल्यम्सन आघाडीवर राहून नेतृत्व करीत आहे. बेंगळूरुविरुद्ध त्याने ४२ चेंडूंत ८१ धावा काढताना आठवे अर्धशतक साकारले. बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात प्रभावी खेळी साकारू न शकणारा शिखर धवन कोलकाताविरुद्ध अपेक्षांची पूर्तता करू शकेल. मनीष पांडेलाही सूर गवसला आहे.

मागील सामन्यात खेळू न शकलेला भुवनेश्वर कुमार पुन्हा वेगवान माऱ्याची धुरा सांभाळू शकेल. रशिद खान, सिद्धार्थ कौल आणि शकिब अल हसन यांची साथ त्याला मिळेल.

ख्रिस लिन, सुनील नरिन आणि कर्णधार दिनेश कार्तिक या मातब्बर खेळाडूंवर कोलकाता संघाची मदार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चार बळी घेण्याची किमया साधणाऱ्या कुलदीप यादवचा आत्मविश्वास वधारला आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स