कोलकाताचा आज हैदराबादशी सामना

गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादशी सामना करताना कोलकाता नाइट रायडर्सचे विजयी मालिका कायम राखण्याचेच ध्येय असणार आहे. इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील ही सर्वोत्तमतेची लढाई आहे. परंतु कोलकाताचा संघ गतवर्षी एलिमिनेटरमध्ये (बाद फेरी) पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे.

एक विजय आणि एका पराजयानंतर दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाताने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर २१ चेंडू आणि आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर सलग ११व्यांदा (२०१२पासून) धावांचा पाठलाग यशस्वी करण्यात कोलकाताचा संघ यशस्वी ठरला. कर्णधार गौतम गंभीर कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुनील नरिननेही आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ७६ धावांचा पाऊस पाडला. नरिनची जादूई फिरकी गोलंदाज अशी ओळख क्रिकेटजगतात होती. ती मागे टाकत नरिनने आपल्या तळपत्या बॅटचे तेज दाखवले. त्याने १८ चेंडूंत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ३७ धावा काढल्या. नियमित सलामीवीर ख्रिस लिन खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकल्यामुळे त्याची जागा नरिनने आत्मविश्वासाने भरून काढली.

कोलकाताने सलामीच्या सामन्यात गुजरात लायन्सविरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवला होता. लिन आणि गंभीर यांनी नाबाद १८४ धावांची भागीदारी रचून तो विजयाध्याय लिहिला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रोमहर्षक लढतीत त्यांचा पराभव केला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज उमेश यादवचे पुनरागमन झोकात झाले आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकी गोलंदाज रशिद खान ही महत्त्वाची अस्त्रे आहेत. गोलंदाजांच्या यादीत हेच दोघे आघाडीवर आहेत. अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर आणि आशीष नेहरा प्रतिस्पर्धी संघावर उत्तम अंकुश ठेवतात.  मुस्ताफिझूर रेहमानकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत.