कोलकाताचा राजस्थानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय
युसूफ पठाण चेंडू ३५  चौकार ३ षटकार ३-४९*
ईडन गार्डन्स स्टेडियमवर युसूफचा ‘पठाणी’ हिसका क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाला. गतवर्षी आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या या संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकणे मुश्किल झाले असताना शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट आणि १६ चेंडू राखून आरामात पराभव केला.
कप्तान गौतम गंभीर (१२) आणि मनविंदर बिस्ला (२९) यांनी ४१ धावांची सलामी दिली. त्यानंतर युसूफ पठाण आणि जॅक कॅलिस यांनी धुवाँदार फटकेबाजी करीत कोलकात्याचा विजय नियंत्रणात आणला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची नाबाद भागीदारी केली. पठाणने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ४९ धावांची दमदार खेळी साकारली. तर कॅलिसने २५ चेंडूंत ४ चौकार आणि एक षटकारासह नाबाद २९ धावा केल्या.
त्याआधी, फिरकीला अनुकूल ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर कोलकात नाइट रायडर्सने वर्चस्व गाजवत राजस्थान रॉयल्सला ६ बाद १३२ धावांवर सीमित ठेवले. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ४० धावा काढताना एक चौकार आणि दोन षटकार खेचले. राजस्थानची २ बाद २७ अशी अवस्था झाली असताना सॅमसनने शेन वॉटसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. वॉटसनने ३५ धावांची उपयुक्त खेळी साकारली.
फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटासह कोलकाताने राजस्थानच्या फलंदाजांवर वेसण घातली. सचित्र सेनानायकेने २६ धावांत २ बळी घेतले. तर सुनील नरिन (१/२०) आणि इक्बाल अब्दुल्ला (१/२२) यांनी त्याला छान साथ दिली. यातून राजस्थानचा संघ सावरूच शकला नाही. अखेरच्या पाच षटकांत त्यांना फक्त ३० धावाच करता आल्या. कप्तान राहुल द्रविड आश्चर्यकारकरीत्या सातव्या स्थानावर फलंदाजीला आला. परंतु वाटय़ाला आलेल्या फक्त तीन चेंडूंत त्याने नाबाद ६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १३२ (शेन वॉटसन ३५, संजू सॅमसन ४०, ओवेस शाह २४; सचित्र सेनानायके २/२६) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १७.२ षटकांत २ बाद १३३ (मनविंदर बिस्ला २९, जॅक कॅलिस नाबाद ३३, युसूफ पठाण नाबाद ४९; शेन वॉटसन १/२१)

आर. अश्विन, चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज
कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना म्हणजे गौतम गंभीर विरुद्ध शेन वॉटसन असा होता. त्यात गंभीरने बाजी मारली!