पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांप्रकरणी भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीवरुन मोहम्मद शमीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. शमीवर आरोप करताना पहिल्या हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे या प्रकरणात शमीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि अन्य गोष्टींचा तपास करणं गरजेचं असल्याचं कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – शमी- हसीनच्या वादाचं ‘हे’ आहे मूळ कारण?

आफ्रिका दौऱ्यावर असताना मोहम्मद शमी कुठे बाहेर फिरायला गेला होता का? किंवा संघासोबत नसताना तो कुठे कुठे जायचा याबद्दल माहिती घेण्यासाठी कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयलाही तपशील मागवला आहे. बीसीसीआयकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं कोलकाता पोलिसांचे सह पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रवीण त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. मात्र कोलकाता पोलिसांनी पाठवलेल्या पत्रावर बीसीसीआयने अजुनही ठाम भूमिका घेतलेली नाहीये.

दरम्यान कोलकाता पोलिसांनी, शमीची पत्नी हसीन जहाँचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्याची मागणी न्यायालयासमोर केली आहे. काही दिवसांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाँने शमीचे अन्य मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. याचसोबत शमीच्या कुटुंबाकडून आपला छळ होत असून, शमीच्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रारही हसीन जहाँने पोलिसांत दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.