News Flash

.. तरीही दोघांना करोनाची बाधा!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा १४वा हंगाम स्थगित करून एक आठवडा पूर्ण होण्यास आला, तरीही खेळाडूंवरील करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

‘आयपीएल’ स्थगितीनंतर कोलकाताचे कृष्णा, सेइफर्ट विलगीकरणात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा १४वा हंगाम स्थगित करून एक आठवडा पूर्ण होण्यास आला, तरीही खेळाडूंवरील करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टिम सेइफर्ट यांना शनिवारी करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या २५ वर्षीय कृष्णा बेंगळूरु येथे राहत्या घरीच  विलगीकरणात आहे. कृष्णाची आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी कृष्णाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

‘‘३ मे रोजी केलेल्या दोन करोना चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर कृष्णा बेंगळूरुला आला. परंतु येथे आल्यानंतर केलेल्या चाचणीदरम्यान त्याला करोना झाल्याचे निष्पन्न झाले,’’ असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले. कोलकाताच्या आतापर्यंत चार खेळाडूंना करोनाची बाधा झाली असून यामध्ये वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरिअर यांचाही समावेश आहे. ४ मे रोजी ‘आयपीएल’ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी २५ मेपासून भारतीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात येणार आहे. त्यापूर्वी कृष्णा पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे सेइफर्टला यंदाच्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु तो कोलकाताच्या जैव-सुरक्षा परिघाचा भाग होता. न्यूझीलंडचे काही खेळाडू शुक्रवारी मालदीवला रवाना झाले. परंतु सेइफर्टला सध्या अहमदाबाद येथेच विलगीकरण करावे लागणार आहे. काही दिवसांनी चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसीवर उपचार चालू असलेल्या चेन्नईतील रुग्णालयात सेइफर्टला दाखल करण्यात येणार आहे.

‘‘सेइफर्टच्या गेल्या १० दिवसांत करण्यात आलेल्या सात करोना चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला. परंतु न्यूझीलंडच्या अन्य खेळाडूंसह मालदीवला जाण्यासाठी निघण्यापूर्वी केलेल्या चाचणीदरम्यान त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. ‘बीसीसीआय’ न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंचे आरोग्य, प्रवासाची योग्य काळजी घेत असल्याने आम्ही आश्वस्त आहोत,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वाइट म्हणाले.

आतापर्यंतचे करोनाग्रस्त खेळाडू

* नितीश राणा

(कोलकाता नाइट रायडर्स)

* अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स)

* देवदत्त पडिक्कल

(रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु)

* डॅनिएल सॅम्स

(रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु)

* वरुण चक्रवर्ती

(कोलकाता नाइट रायडर्स )

* संदीप वॉरिअर

(कोलकाता नाइट रायडर्स)

* वृद्धिमान साहा

(सनरायजर्स हैदराबाद)

* अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स)

* प्रसिध कृष्णा

(कोलकाता नाइट रायडर्स)

* टिम सेइफर्ट

(कोलकाता नाइट रायडर्स)

‘आयपीएल’चे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवावेत!

लंडन : स्थगित करण्यात आलेल्या ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात इंग्लंड येथे खेळवावेत, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने सुचवले आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. ‘‘भारताचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये मोकळा अवधी आहे. यादरम्यान इंग्लंडमध्येच ‘आयपीएल’चे आयोजन करणे ‘बीसीसीआय’ला सोपे ठरेल. त्याशिवाय दोन्ही संघांचे सर्व प्रमुख खेळाडू उपलब्ध असतील आणि प्रेक्षकांनाही प्रवेश दिला जाऊ शकतो,’’ असे पीटरसन म्हणाला.

श्रीलंका ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी उत्सुक

नवी दिल्ली : ‘आयपीएल’च्या उर्वरित लढती खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला पसंती मिळण्याची शक्यता असली तरी श्रीलंकन क्रिकेट मंडळानेसुद्धा यामध्ये उत्सुकता दर्शवली आहे. ‘‘सप्टेंबपर्यंत श्रीलंकेतील मैदानांच्या डागडुजीचे कार्य १०० टक्के पूर्ण होईल. ऑगस्टमध्ये आम्ही श्रीलंका प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबत आशावादी आहोत. त्याशिवाय भारतीय खेळाडूंना येथील वातावरणात खेळताना फारशी अडचण जाणवणार नाही. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने नक्कीच या पर्याचाचा विचार करावा,’’ असे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या व्यवस्थापकीय समितीचे मुख्य अर्जुन डी सिल्व्हा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:58 am

Web Title: kolkatas krishna seifert in secession after ipl postponement corona ssh 93
Next Stories
1 माजी हॉकीपटू-प्रशिक्षक कौशिक यांचे करोनामुळे निधन
2 माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग कालवश
3 दडपणाखाली कामगिरी बहरते! राही सरनोबतला खात्री
Just Now!
X