बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये महिलांनी कारकीर्द करणे हेच मुळात आव्हानात्मक मानले जाते. या आव्हानात्मक खेळात भारताच्या कोनेरू हम्पी हिने जगज्जेतेपदाची ‘चॅलेंजर खेळाडू’ होण्याचा मान मिळविला आहे. नुकतीच ताश्कंद ग्रां. प्रि. स्पर्धा जिंकून तिने आपल्या यशाच्या मालिकेत आणखी एका अजिंक्यपदाची भर घातली आहे. भारतामधील चौसष्ट घरांची सम्राज्ञी असलेल्या हम्पीचे लक्ष्य आहे ते जगज्जेतेपद मिळविण्याचे !
भारतात गेल्या दहा वर्षांमध्ये बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली आहे आणि या खेळास प्रायोजकही मिळू लागले आहेत. तरीही महिलांनी बुद्धिबळात कारकीर्द करणे ही काही सोपी गोष्ट नाही. हम्पी हिला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप झगडावे लागले. तरीही तिने अतिशय संघर्ष करीत अनेक अडचणींवर मात करीत जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाची खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. ज्याप्रमाणे जागतिक स्तरावर अन्य देशांचे खेळाडू विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचा धसका घेत असतात, त्याप्रमाणेच महिलांमध्ये अन्य देशांच्या खेळाडूंनी हम्पीबाबत धसका घेतला आहे.
 तिचे वडील अशोक हे स्वत: चांगले बुद्धिबळपटू असल्यामुळे या खेळात कारकीर्द करताना तिला संपूर्ण प्रोत्साहन व सहकार्य घरातूनच मिळाले. मध्यम आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या हम्पीला या खेळाची कारकीर्द करताना थोडेसे झगडावे लागले. या खेळात जागतिक स्तरावर कारकीर्द करावयाची असेल तर परदेशातील अव्वल दर्जाच्या स्पर्धामध्ये सहभागी होणे अनिवार्य असते. परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेताना आर्थिक खर्चाचे ओझे आपोआपच वाढते.
हम्पीचे वडील अशोक यांनी राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी स्पर्धेपर्यंत मजल गाठली आहे. नोकरीमुळे त्यांना खेळाच्या कारकिर्दीवर अपेक्षेइतके लक्ष ठेवता आले नाही. त्यामुळेच आपले आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याचे स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण करावे म्हणून त्यांनी हम्पीला प्रोत्साहन दिले. खेळाचे बाळकडूही त्यांनीच दिले.
हम्पी हिने १०, १२ व १४ वर्षांखालील गटात जागतिक स्तरावर अजिंक्यपद मिळविले आहे. अवघ्या १२ व्या वर्षीच तिने महिलांचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविला. तेथेच तिच्या भावी कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. तिने १५ व्या वर्षीच ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळविला. २००१ मध्ये तिने कनिष्ठ गटात जागतिक स्पर्धाजिंकताना अनेक अनुभवी खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला होता. तिच्या या कामगिरीची दखल अनेक बुद्धिबळ पंडितांना घ्यावी लागली होती. महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्याची संधी तिला २००६ मध्ये मिळाली होती, मात्र दुसऱ्याच फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले होते. २००८ मध्ये तिने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र होऊ यिफान या चीनच्या खेळाडूने तिला पराभूत केले होते. हम्पीने २००९ ते २०११ या कालावधीत फिडे ग्रां.प्रि. स्पर्धामध्ये एकुणात दुसरे स्थान मिळविले. त्यामुळे जगज्जेतेपदासाठी आव्हान देणारी खेळाडू होण्याचा मान तिला मिळाला. तथापि या वेळीही यिफान हिच्या चतुरस्र खेळापुढे तिला विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार करता आले नाही. तरीही तिने यिफानविरुद्धच्या आठ डावांपैकी पाच डावांमध्ये बरोबरी स्वीकारीत आपले कौशल्य दाखवून दिले. जे तीन डाव तिने गमावले, त्या डावांमध्येही तिने कौतुकास्पद लढत दिली होती.
दिलीजान ग्रां. प्रि. स्पर्धेत तिने यंदा विजेतेपद मिळविताना अ‍ॅना मुझीचुक व निना झेग्निस यांना मागे टाकले होते. आक्रमक चाली खेळण्याबाबत ख्यातनाम असलेली हम्पी ही योग्य वेळी बचावात्मक खेळ करण्यातही अव्वल दर्जाची खेळाडू मानली जाते. शेवटपर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध जिद्दीने लढत देण्याबाबतही ती अव्वल दर्जाची खेळाडू आहे. आंध्रप्रदेशची २६ वर्षीय खेळाडू हम्पी ही कोणत्याही वेळी डावास कलाटणी देण्याबाबत ख्यातनाम आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर हम्पीचे फारसे सख्य नसल्यामुळे काही वेळा तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष करीत आपल्या देशाचा नावलौकिक उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदप्रमाणेच तिने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरावे अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा
आहे.