भारताच्या कोनेरू हंपीने जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. तिने चीनच्या तिंगजेई लेई हिच्यावर शानदार विजय मिळविला व उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.
भारताची अन्य खेळाडू द्रोणावली हरिकाने अमेरिकेच्या इरिना क्रुश हिच्याविरुद्धचा पहिला डाव बरोबरीत सोडवला. ही फेरी जिंकण्यासाठी तिला इरिनाविरुद्धचा दुसरा डाव जिंकणे अनिवार्य आहे. या डावात तिला काळ्या मोहऱ्यांनी खेळावे लागणार आहे.
या स्पर्धेत आता फक्त ३२ खेळाडू उरले असल्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली आहे. त्यामुळेच की काय सोळा डावांपैेकी अकरा डाव बरोबरीत सुटले. हंपीखेरीज व्हिक्टोरिजा स्मिलिटी (लिथुवेनिया), अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेनिक, व्हॅलेन्टिना गुनिना व अ‍ॅलिसा गालियामोवा (सर्व रशिया) यांनी विजय मिळविला. यंदा ही स्पर्धा बाद पद्धतीने होत असून प्रत्येक फेरीत दोन डावांचा समावेश आहे. जर त्यामध्ये बरोबरी झाली तर टायब्रेकरचा उपयोग करण्यात येतो.
हंपीने लेईविरुद्धच्या पहिल्या डावात काळ्या मोहरा असूनही सुरेख चाली करीत ६७ चालींमध्ये विजयश्री मिळविली. त्यामुळे तिला दुसऱ्या डावात बरोबरी स्वीकारली तरीही पुढच्या फेरीत स्थान मिळविण्याची संधी मिळेल. या डावात तिला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदा घेता येणार आहे.
हरिकाला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा लाभ घेता आला नाही. क्रुशने सिसिलीयन कान तंत्राचा उपयोग करीत पहिला डाव केवळ २८ चालींमध्ये बरोबरीत ठेवला.