दक्षिण कोरियासारख्या देशात बेसबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारख्या खेळांसाठी अनुकूल वातावरण आहे. पण कबड्डीसारखा खेळ आता तिथे हळूहळू रुजू लागला आहे. प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर डॉ. सोल डाँग-सँग हे कोरियाचे पंच मात्र हमखास लक्ष वेधून घेतात. कारण सोल यांच्या पीएच.डी.चा प्रबंध चक्क कबड्डीवर आहे.
चार वर्षांपूर्वी सोल यांची कबड्डीशी गाठ पडली. त्यानंतर त्यांनी खेळाचे मर्म जाणून घेण्यासाठी अथक मेहनत घेतली. २०१२ आणि २०१३ मध्ये गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या कबड्डीच्या विशेष शिबिरांना हजेरी लावून त्यांनी कबड्डीचे ज्ञात वृद्धिंगत केले. गतवर्षी इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या दक्षिण कोरियाचे ते प्रशिक्षक होते.
कबड्डीवरील प्रबंधाविषयी अधिक माहिती देताना ३५ वर्षीय सोल म्हणाले, ‘‘माझ्या प्रबंधात भारत आणि दक्षिण कोरियाचा कबड्डीचा इतिहास, संघटनात्मक वाटचाल, विकास, आदी गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हा प्रबंध सुमारे शंभर पानांचा आहे.’’
सध्या प्रो कबड्डीमध्ये यांग हुन ली बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या चतुरस्र चढायांनी लक्ष वेधून घेत आहे. याबाबत सोल म्हणाले, ‘‘भारतात प्रो कबड्डीमुळे ली याने लोकप्रियता मिळवली आहे, हे पाहून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. पाटणा पायरेट्स संघाचे ट्रेनर ईम तई डेक हेसुद्धा कोरियाचे आहेत. पण दक्षिण कोरियात हा खेळ फारसा माहीत नसल्यामुळे त्यांना तेवढी ओळख नाही. परंतु आशियाई कांस्यपदकामुळे कबड्डीकडे आशेने पाहू लागले आहेत.’’
‘‘आमच्या देशात शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या स्पर्धा होतात. सध्या सहभागी संघांची संख्या मोठी नसली तरी आशादायी आहे. भारताचे ई. प्रसाद राव यांनीसुद्धा कोरियाच्या कबड्डी विकासासाठी मोलाचे सहकार्य केले आहे,’’ असे सोल यांनी सांगितले.
भविष्यात कबड्डीवर आधारित पुस्तक लिहिण्याचा मानस असल्याचे सोल यांनी सांगितले. ‘‘देशामध्ये कबड्डीचे ज्ञान वाढावे, या हेतूने पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहे. या पुस्तकात खेळाची माहिती, तंत्र-कौशल्य, विविध स्तरावरील प्रशिक्षण, आदी इत्थंभूत माहिती असेल,’’ असे या वेळी त्याने सांगितले.